मुंबईकरांसाठी खूशखबर! बारवी, आंध्रा, मोडकसागर भरले, भातसा, तानसा भरण्याच्या मार्गावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 02:12 AM2020-08-17T02:12:40+5:302020-08-17T06:52:48+5:30
भातसा, तानसा आणि मध्य वैतरणा भरण्याच्या उंबरठ्यावर होते.
ठाणे : चार दिवसांपासून जिल्ह्यातील सातही तालुक्यांत पावसाची रिपरिप सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून धरणांच्या लाभक्षेत्रातही पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे पाणीकपातीची चिंता काहीअंशी कमी झाली आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी ठाणे, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणासह आंध्रा, मोडकसागर १०० टक्के भरले होते. याशिवाय भातसा, तानसा आणि मध्य वैतरणा भरण्याच्या उंबरठ्यावर होते.
गेल्या वर्षी सर्व धरणे आॅगस्ट महिना संपण्याआधी भरली होती. यंदा पाऊस लांबणीवर पडल्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्याबाबत चिंता व्यक्त होत होती. मात्र, दरम्यानच्या काळात धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. बारवी धरणासह भातसा, आंध्रा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील एमआयडीसीच्या बारवी धरण क्षेत्रात २४ तासांत सरासरी ७१.५० मिमी पाऊस पडला आहे. यापैकी बारवी धरणात ३२ मिमी, खानिवरे ११६, कान्होळ ३७, पाटगाव ८३ आणि ठाकूरवाडीच्या लाभक्षेत्रात ५० मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. आता या धरणाची पाणीपातळी ६८.९६ मीटर झाली आहे.
या धरणात आणखी ३.६४ मीटर पाणीसाठा होणे अपेक्षित आहे. तूर्तास या धरणात ७१.२२ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी याचवेळी तो १००.११ टक्के होता
बारवी धरणात ७२.६० मीटर म्हणजे ३४०.४८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा यंदा करण्यात येणार आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून साडेतीन मीटर पाणी होणे आवश्यक आहे. त्यानंतर, या पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. बारवीप्रमाणेच भातसा धरणात ८०.८९ टक्के पाणीसाठा झाला आहे. रविवारी या धरणक्षेत्रात ३८ मिमी पाऊस
पडला.
आंध्र धरणात यंदा प्रथमच रविवारी ८१ मिमी पाऊस पडला. आता या धरणात ५२.५७ टक्के पाणीसाठा झाला आहे. मोडकसागरमध्ये ५१ मिमी पाऊस पडला. आता या धरणात ९०.६३ टक्के साठा आहे. तानसात २१ मिमी पाऊस पडला असून आता धरणात ७९ टक्के पाणीसाठा तयार झाला. मध्य वैतरणात रविवारी ५० मिमी पाऊस पडून, धरणात ८२ टक्के पाणीसाठा संकलित झाला आहे.
>जिल्ह्यात रविवारी सरासरी २३ मिमी पाऊस पडला. यापैकी कल्याणला ३१, मुरबाडला २०, भिवंडीला १३, शहापूरला ४६, उल्हासनगरला २९ आणि अंबरनाथला १२ मिमी पाऊस पडला आहे.