मीरा- भाईंदर पालिका आयुक्तपदी दिलीप ढोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:17 AM2021-03-04T05:17:04+5:302021-03-04T05:17:04+5:30
मीरा रोड : मीरा-भाईंदर पालिकेत आठ महिन्यांपूर्वी आलेले डॉ . विजय राठोड यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता ...
मीरा रोड : मीरा-भाईंदर पालिकेत आठ महिन्यांपूर्वी आलेले डॉ . विजय राठोड यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता दिलीप ढोले हे नवे आयुक्त नियुक्त झाले आहेत. ढोले यांनी आयुक्त म्हणून कामकाजाला सुरूवात केली आहे.
जानेवारी २०१३ मध्ये सुरेश काकाणी तर जुलै २०१४ मध्ये सुभाष लाखे आयुक्त म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०१५ मध्ये अच्युत हांगे तर ऑगस्ट २०१६ मध्ये डॉ. नरेश गीते आयुक्त म्हणून दाखल झाले. बी . जी . पवार यांची कारकीर्द अवघी तीन महिन्यांची तर अच्युत डांगे यांचा कार्यकाळ अवघ्या चार महिन्यांचा ठरला. सर्वात जास्त बालाजी खतगावकर हे २१ महिने आयुक्त म्हणून राहिले. परंतु भाजप आणि मेहतांचा त्यांच्यावर बसलेला शिक्का, तक्रारी यामुळे ते वादग्रस्त ठरले. माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या शिफारशीवरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खतगावकर यांची नियुक्ती केली होती.
खतगावकर यांच्यानंतर आलेले आयुक्त चंद्रकांत डांगे यांनीही मेहतांशी संबंधित काशिमीरा येथील अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त केले. वाढत्या कोरोना संसर्गामुळे त्यांची अवघ्या चार महिन्यात बदली होऊन २३ जून २०२० रोजी डॉ . विजय राठोड आयुक्तपदी नेमले गेले. थेट सनदी अधिकारी आणि तरुण असल्याने राठोड यांच्याकडून नागरिकांना बऱ्याच अपेक्षा होत्या. परंतु त्यांनाही राजकारण्यांसह प्रशासनातील कामचुकार, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्यात फारसे यश आले नाही.
------------------------
नव्या आयुक्तांना प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता पालिकेत अतिरिक्त आयुक्त असलेल्या ढोले यांना आयुक्त पदी नेमले आहे. ढोले यांना प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असून अनेक मंत्र्यांकडेही त्यांनी काम केले आहे. त्यामुळे पालिकेतील बेकायदा चालणारे कामकाज, भोंगळ कारभार, पैशांची होणारी उधळपट्टी, बेकायदा बांधकामे या सोबतच प्रशासनातील मुजोर आदींवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी नवे आयुक्त कसे पार पाडतात हेही लवकरच स्पष्ट होईल.