डिम्पल मेहता होणार महापौर; यंदाचे महापौरपद इतर मागासवर्गीय महिलेसाठी राखीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 04:53 AM2017-08-22T04:53:57+5:302017-08-22T04:54:18+5:30
मीरा भार्इंदर महापालिकेच्या निवडणुकीत ६१ जागा जिंकून एकहाती सत्ता आणणा-या भाजपात महापौरपदासाठी आमदार नरेंद्र मेहता यांचे धाकटे बंधू विनोद यांच्या नगरसेविका पत्नी डिम्पल मेहता यांचेच नाव आघाडीवर आहे.
मीरा रोड : मीरा भार्इंदर महापालिकेच्या निवडणुकीत ६१ जागा जिंकून एकहाती सत्ता आणणाºया भाजपात महापौरपदासाठी आमदार नरेंद्र मेहता यांचे धाकटे बंधू विनोद यांच्या नगरसेविका पत्नी डिम्पल मेहता यांचेच नाव आघाडीवर आहे. डिंपल या प्रभाग १२ मधून निवडून आल्या आहेत.
यंदाचे महापौरपद हे इतर मागासवर्गीय महिलेसाठी राखीव आहे. आमदार मेहता हे भाजपाच्या विजयाचे शिल्पकार ठरल्याने महापौरपद आपल्या कुटुंबात ठेवण्याची त्यांची मागणी पक्ष अव्हेरणार नाही. त्यामुळे पक्षातील इतर स्पर्धकांपेक्षा डिम्पल यांचेच पारडे जड आहे. गीता जैन यांना महापौर करण्यात आल्यानंतर अनेक विषयांवरुन दोघांत वाद होत होते. शिवाय स्वत: महापौर असताना मेहता यांचे त्यावेळी गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्याशी बिनसले होते. निर्मला सावळे महापौर असतानाही तोच प्रकार होता.
पालिकेत डिम्पल यांना महापौर म्हणून बसवण्यामागे आ. मेहतांनी अनेक फायद्यांचा विचार केल्याची शक्यता आहे. कारण मानाचे महापौरपद आपल्याकडे ठेवतानाच पालिकेतील कारभारही त्यांना हवा तसा चालवणे सोपे जाईल. डिम्पल या २०१२ मध्ये निवडून आल्या होत्या. नंतर त्यांना महिला-बालकल्याणचे सभापतीही केले होते.
- भाजपाच्या दोन वेळा निवडून आलेल्या नगरसेविका कल्पना म्हात्रे याही दावेदार मानल्या जात होत्या. परंतु त्यांचा पत्ता कापण्यात आल्याने डिम्पल यांचा मार्ग मोकळा झाला. वंदना मंगेश पाटील, ज्येष्ठ नगरसेविका प्रभात पाटील, डॉ. प्रिती पाटील, सुनिता भोईर, नयना म्हात्रे आदी नगरसेविकाही महापौरपदासाठी दावा करून मेहता यांना नाराज करतील, अशी शक्यता नाही.