ठाण्यात चोरट्यांची कमाल, जप्तीच्या दारुची केली चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 10:52 PM2018-09-14T22:52:46+5:302018-09-14T22:57:22+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाण्याच्या कोपरी येथील कार्यालयातील गोदामातून जप्त केलेल्या मद्याचे २७ हजार ३६० रुपयांचे तीन बॉक्स दिवसाढवळ्या चोरणा-या दोघांना कोपरी पोलिसांनी अटक केली आहे.
ठाणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोपरी येथील कार्यालयातील गोदामातून जप्त केलेल्या मद्याचे २७ हजार ३६० रुपयांचे तीन बॉक्स अगदी दिवसाढवळ्या चोरणा-या मुस्तफा अब्दुल कयुम शेख (१८) आणि अशरद हजरत अली शेख (२८) या दोघांना कर्मचा-यांच्या सतर्कतेमुळे कोपरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील ऐवज हस्तगत केला असून त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
विशेष म्हणजे याच उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातून पाच दिवसांपूर्वी जीप चोरीस गेली होती. याप्रकरणी तिघांना निलंबितही करण्यात आले आहे. ही चोरी उघडकीस आल्यानंतर पुन्हा याठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याने या कार्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयाच्या आवारातील गोदामात धाडीत जप्त केलेला मद्यसाठा ठेवला जातो. १२ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास हे दोघेजण कार्यालयाच्या आवारात शिरल्यानंतर गोदामाच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडला. त्यांनी गोदामातील मद्यसाठ्यातील तीन बॉक्स चोरले. चोरटे दारूचे बॉक्स घेऊन बाहेर पडत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे चालक विशाल सुतार आणि शिपाई अविनाश जाधव यांनी त्यांना रंगेहाथ पकडले. दोघांच्या चौकशीतून गोणीतून त्यांनी दारूचे तीन बॉक्स आणल्याचे आढळले. या दोघांना कोपरी पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर त्यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांची रवानगी तळोजा येथील कारागृहात करण्यात आली आहे.