ठाणे एसटीस्थानकातून अपहरण करून प्रवाशास लुबाडणाऱ्या पोलीस हवालदारासह दोघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 10:14 PM2018-10-05T22:14:58+5:302018-10-05T22:22:25+5:30
ठाणे एसटी थांब्यासमोरील सार्वजनिक स्वच्छतागृहात लघुशंकेसाठी आलेल्या ४२ वर्षीय प्रवाशाचे अपहरण करुन लुबाडणा-या ठाणे रेल्वे पोलीस दलातील हवालदार सुभाष नागरेसह दोघांना ठाणेनगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे.
ठाणे : ठाणे रेल्वेस्थानकासमोरील एसटीस्थानकातील शौचालयातून एका प्रवाशाचे गुरुवारी दुपारी अपहरण करून त्याच्याकडून १० हजारांच्या रोकडसह सोन्याचे दागिने असा ३५ हजारांचा ऐवज लुबाडणा-या रेल्वे पोलीस दलातील हवालदार सुभाष नागरे आणि होमगार्ड भूषण मोरे या दोघांना ठाणेनगर पोलिसांनी अटक केली. त्यांना ८ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
हा प्रवासी ठाणे एसटीस्थानकातील सार्वजनिक शौचालयामध्ये ४ आॅक्टोबर रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास लघुशंकेसाठी आला. त्यावेळी भूषण मोरे या गृहरक्षक दलाच्या जवानाने तू माझ्या गुप्तांगाला हात लावला, असा आरोप त्याच्यावर केला. त्यानंतर, हा प्रकार बाहेर सांगण्याची धमकीही त्याला दिली. त्यानंतर, नागरे या हवालदारासह दोघांनीही त्याला कळवा रेल्वेस्थानकाबाहेरील चौकीत नेले. तिथे त्याला शिवीगाळ, मारहाण करून त्याच्याकडून १५ हजारांची २५० मिलिग्रॅम एक आणि १० हजारांची दुसरी अशा दोन सोनसाखळ्या तसेच १० हजारांची रोकड असा ऐवज हिसकावला. दुपारी २ ते ४ असा दोन तास हा प्रकार सुरू होता. आपला कोणताही दोष नसताना नाहक पोलिसांनीच लूटमार केल्याचे या प्रवाशाने नातेवाइकांना सांगितले. हा प्रकार समजताच त्यांनी पुन्हा कळवा स्थानकातील चौकी गाठून तिथे ही तक्रार दिली. तेथील रेल्वे पोलिसांनी या दोघांनाही पकडून ठाणेनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्याकडून १५ हजारांची एक सोनसाखळी आणि सहा हजारांची रोकड असा २१ हजारांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यांनी यापूर्वीही असे प्रकार केले आहेत का, याचाही शोध घेण्यात येत असल्याचे ठाणेनगर पोलिसांनी सांगितले.
.....................
सोनाराने दागिने घेतलेच नाही
या प्रवाशाकडील दागिन्यांची लूटमार केल्यानंतर नागरे आणि मोरे या दोघांनीही बाजारपेठेतील एका सराफाकडे हे दागिने विकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला काहीतरी शंका आल्यामुळे त्याने ते घेतले नाही. त्यातील एक सोनसाखळी पोलिसांनी हस्तगत केली असून दुस-या सोनसाखळीचाही शोध घेण्यात येत आहे.