ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी शिवसेनेच्या दीपाली पाटील बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 07:00 PM2019-08-26T19:00:47+5:302019-08-26T19:07:56+5:30
जिल्हा परिषदेवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाची सत्ता आहे. जाधव यांच्या राजीनाम्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ही जागा रिक्त होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पद अनुसूचित जमातीच्या (एसटी) महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे.
ठाणे : जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या रिक्त जागी शिवसेनेच्या दीपाली दिलीप पाटील यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. भिवंडी तालुक्यातील वापे येथील त्या रहिवाशी आहे. माजी अध्यक्षा मंजुषा जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या अध्यक्ष पदी पाटील यांची बिनविरोध निवड केल्याचे शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी लोकमतला सांगितले.
जिल्हा परिषदेवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाची सत्ता आहे. जाधव यांच्या राजीनाम्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ही जागा रिक्त होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पद अनुसूचित जमातीच्या (एसटी) महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. या आरक्षणास पात्र असलेल्या दीपाली पाटील यांच्या उमेदवारी विरोधात अन्य कोणाचाही अर्ज दाखल न झाल्यामुळे दुपारी ३ वा. घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या सभेत पाटील यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवून माघार घेण्याची मुदतही दिली. मात्र माघार न घेतल्यामुळे उपस्थित सर्व सदस्यांच्या समक्ष पाटील यांचा एक अर्ज शिल्लक असल्याचे स्पष्ट करून त्या बिनविरोध निवडून असल्याचे घोषीत करण्यात आले, असे ठाणे उपविभागीय अधिकारी तथा विशेष सभेचे अध्यक्ष आणि निवडणुकीचे पिठासन अधिकारी अविनाश शिंदे यांनी लोकमतला सांगितले.
अध्यक्ष पदाच्या या निवडीस अनुसरून घेतलेल्या या विशेष सभेला ठाणे जिल्हा परिषदेचे ४८ सदस्ये व तीन सभापती आदी ५३ सदस्य या सभेला उपस्थित होते. याशिवाय पंचायत समितीचे तीन सभापती या अध्यक्ष पदाच्या निवड सभेला उपस्थित होते. मात्र एकच अर्ज आलेला असल्यामुळे मतदानाचा प्रसंग आला नाही आणि पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट करण्यात आले असेही शिंदे यांनी निदर्शनात आणून दिले. या निवडीनंतर अध्यक्षा पाटील यांनी स्वर्गीय आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर जाऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत पुढी कामकाजासाठी आशिर्वाद घेतला. यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या दालनात शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्या समक्ष जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी दीपाली पाटील यांना अध्यक्ष पदाची खुर्ची सन्मानपूर्वक बहाल केली.
आगामी विधान सभेची निवडणूक लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे सर्वाधिक सदस्य असलेल्या शिवसेनेने या जिल्हा परिषदच्या सत्तेत राष्ट्रवादीला उपाध्यक्ष पदासह सभापती पद आधीच दिलेले आहे. याशिवाय भाजपाला काही काळ सत्तेबाहेर ठेवले होते. त्यातील एका सदस्यास सभापती पद देऊन भाजपालाही आधीच सत्तेत सहभागी करून घेतले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत विरोधी पक्षच उरलेला नसल्यामुळे सेनेच्या पाटील यांची बिनविरोध निवड होणे शक्य झाले आहे. यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश पाटील यांनी नियोजन करून अध्यक्ष पदाची ही निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळवले आहे. या अध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार इच्छुक होते. मात्र शिंदे यांनी पाटील यांच्या नावास ग्रीन सिग्नल देत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याविरोधात अन्य कोणत्याही सदस्याने उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याचे प्रकाश पाटील यांनी लोकमतला सांगितले.