अनधिकृत बांधकामे वाचवण्यासाठी थेट केंद्रीयमंत्र्यांचा फोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:46 AM2021-09-21T04:46:14+5:302021-09-21T04:46:14+5:30
ठाणे : अनधिकृत बांधकामांवरील महानगरपालिकेची कारवाई थांबवण्यासाठी आपल्याला थेट केंद्रीयमंत्र्यांकडून फोन आले, असा गौप्यस्फोट ठाण्याचे महापौर नरेश ...
ठाणे : अनधिकृत बांधकामांवरील महानगरपालिकेची कारवाई थांबवण्यासाठी आपल्याला थेट केंद्रीयमंत्र्यांकडून फोन आले, असा गौप्यस्फोट ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सर्वसाधारण सभेत सोमवारी केल्याने एकच खळबळ उडाली. त्या मंत्र्यांचे नाव जाहीर करणार नाही, मात्र अनधिकृत बांधकामे वाचवण्यासाठी कोणाचेही फोन आले तरी अशा कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. यावरून भाजप आणि शिवसेनेमधील संघर्ष नजीकच्या काळात अधिक पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
आपल्यावर झालेला हल्ला हा अनधिकृत बांधकामांवर केलेल्या कारवाईमुळेच झाला, या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी केलेल्या वक्तव्यावरून अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोमवारी भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी यासंदर्भात सभागृहात प्रश्न उपस्थित केला. पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात काय पत्रव्यवहार केला, बांधकामे तोडण्यासंदर्भात पालकमंत्र्यांचे काय आदेश आहेत, या आदेशाची प्रत मिळावी, अशी मागणी त्यांनी प्रशोत्तराच्या तासात केली. मात्र महापौरांनी पाटील यांच्या प्रश्नावर आक्षेप घेत पालकमंत्री किंवा गृहनिर्माणमंत्री यांनी प्रशासनासोबत काय पत्रव्यवहार केला हे सांगणे बंधनकारक नाही, तसेच प्रश्न चर्चेला घ्यायचा की नाही हा अधिकार आपला असल्याचा खुलासा केला. मंत्री हे सभागृहाचा भाग नसल्याचे सांगत त्या प्रत्येकाचा आदर राखला पाहिजे, असे सांगितले.
पिंपळे यांच्यावरील हल्ल्यानंतर शहरातील अनधिकृत बांधकामांवर मोठ्या प्रमाणात कारवाईला सुरुवात करण्यात आली. कृष्णा पाटील यांनी पालकमंत्री आणि गृहनिर्माणमंत्री यांच्या पत्रव्यवहारासंदर्भातच प्रश्न उपस्थित केल्यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी अनधिकृत बांधकामे वाचवण्यासाठी थेट केंद्रीयमंत्र्यांचा फोन आल्याचे सांगितल्याने एकच खळबळ उडाली.