जिल्ह्यातील जलशक्तीच्या कामांची निती आयोगाकडून प्रत्यक्ष पाहणी
By सुरेश लोखंडे | Published: November 5, 2023 08:31 PM2023-11-05T20:31:27+5:302023-11-05T20:31:36+5:30
भिवंडी तालुक्याचा दौर्यात कोन, कुंभारशिव, तळवली(लोणे) व आन्हे-सोर या गावांना भेट देऊन कामांची पाहणी केली.
ठाणे: केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या सदस्या जाग्रिती सिंगला आणि केंद्रीय भूजल मंडळाच्या वैज्ञानिक वैष्णवी परिहार आदींच्या केंद्रीय पथकाने प्रत्यक्ष पाहणी करून कामांची खात्री करून घेतली. यामध्ये तलावातील गाळ काढल्यामुळे काय फायदे झाले याबाबत माहिती या पथकाने ग्रामस्थांशी चर्चा करून मिळवल.
जिल्ह्यातील जलशक्ती अभियानाच्या कामाची पाहणी करण्यासाठी निती आयोगाचे हे केंद्रीय पथक गेले दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर होते. दरम्यान जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्याकडून कामांची माहिती घेत या पथकाने गांवखेड्यातील कामांना प्रत्यक्ष भेटी देऊन गांकर्यांकडून वस्तुस्थिती समजून घेतली. भिवंडी तालुक्याचा दौर्यात कोन, कुंभारशिव, तळवली(लोणे) व आन्हे-सोर या गावांना भेट देऊन कामांची पाहणी केली.
कुंभारशिव येथील जल जीवन योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या उदभव विहिरीमध्ये तयार करण्यात आलेल्या आडव्या विंधन विहिरीच्या कामाची पाहणी केली. या नळ पाणीपुरवठा योजनेबाबत भूवैज्ञानिक सपना बोरकर यांनी यावेळी माहिती दिली. मौजे तळवली (लोणे) शाळेच्य छतावरील पावसाचे पाणी साठवण्याच्या योजनेची पाहणी केली.
या योजने अंतर्गत सोलर पॅनल द्वारे वीज निर्मिती करून त्याद्वारे विंधन विहिरीतून पाणी उपसा करण्यात येत आहे,अशी माहिती भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे उपअभियंता संजय सुकते यांनी दिली. आन्हे सोर नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाची ही त्यांनी पाहणी केली. ट्रेंच गॅलरीमार्फत उदभव विहिरीत पाणी घेण्यात येत असल्याचे बोरकर यांनी सांगितले. भातसा नदीवर असलेल्या या योजनेची पाहणी केली.