टीडीसीसी बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडीसाठी संचालक नॉट रिचेबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:39 AM2021-04-11T04:39:04+5:302021-04-11T04:39:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : राज्यातील सहकार धुरिणांचे लक्ष लागून असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्यातील सहकार धुरिणांचे लक्ष लागून असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड १२ एप्रिल रोजी पार पडणार आहे. या पदांच्या निवडीसाठी वसईच्या बहुजन विकास आघाडी व भाजपा पुरस्कृत सहकार पॅनलचे पारडे जड मानले जात आहे. कारण बँकेच्या २१ संचालकांपैकी या पॅनलचे स्वत:चे १६ संचालक व अन्य मित्र पक्षांचे दोन असे ओव्हर फ्लो संख्याबळ आहे. यावरून याच पक्षांची बँकेवर पुन्हा सत्ता प्रस्तावित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्याच्या सत्तेत एकत्र असलेल्या महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी एकत्र येऊन या बँकेच्या निवडणुकीसाठी महाविकास परिवर्तन पॅनल तयार करून उमेदवार दिले होते. मात्र, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांचा पुरस्कृत प्रत्येकी एक संचालक यावेळी निवडून आलेला आहे. परंतु, अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी या दोन्ही पॅनलचे २१ संचालक सद्यस्थितीला काही दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. बँकेवर विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष बविआ व भाजपाचे आहे. याशिवाय २१ पैकी १८ संचालकही त्यांचेच आहे.
बँकेवर बहुमताच्या जोराने पुन्हा प्रस्तावित करून वर्चस्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नातील बविआ - भाजप मित्र पक्षांचे संचालक फोडून सत्तेजवळ जाण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आत्मघाती ठरणार आहे. तरीही कोणत्याही लढाईत शत्रूला कमजोर समजू नये, या भूमिकेतून सहकार पॅनलचे १८ संचालक अज्ञातस्थळी वास्तव्याला आहेत. याशिवाय शेवटच्या क्षणापर्यंत आत्मविश्वासाने लढणाऱ्या योद्धयाप्रमाणे महाविकास आघाडीचे संचालकही अज्ञात स्थळी आहेत.
---------
बँकेच्या या २१ संचालकांपैकी बहुजन विकास आघाडीचे ९ संचालक व भाजपाचे सात आणि अन्य सहकारी मित्र पक्षांचे दोन आदी १८ संचालकांचे नेतृत्व विद्यमान अध्यक्ष राजेंद्र पाटील व उपाध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे करीत आहे. बँकेवरील सत्तेत सध्याचे पदाधिकारीच कायम राहतील की कसे, या विषयी जाणून घेतले असता बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मात्र ‘बँकेचे सर्व डायरेक्टर सध्या एकत्र आहेत, ते ठरवतील काय ते, मी त्यात पडत नाही’ असे स्पष्ट केले आहे. तर सोमवारी ही निवड आहे, आम्ही एकत्र बसून काय ते ठरवू, असे भाजपा आमदार किसन कथोरे व आ. संजय केळकर यांनी लोकमतला सांगितले.