कृषी प्रक्रिया उद्योगासाठी ग्रामीण पतसंस्थांनी पुढाकार घेतल्यास अर्थकारण बदलू शकते - सतीश मराठे
By नितीन पंडित | Published: January 10, 2023 06:22 PM2023-01-10T18:22:10+5:302023-01-10T18:22:50+5:30
कृषी प्रक्रिया उद्योगासाठी ग्रामीण पतसंस्थांनी पुढाकार घेतल्यास अर्थकारण बदलू शकते असे आरबीयचे संचालक सतीश मराठे यांनी म्हटले.
भिवंडी : भारत कृषीप्रधान देश असून या देशात कृषी प्रक्रिया उद्योगाला मोठ्या प्रमाणात वाव आहे.या उद्योगाला अर्थसहाय्य करण्यासाठी ग्रामीण पतसंस्थांनी पुढाकार घेतला तर ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांचे अर्थकारण बदलू शकते,
तेथील नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावू शकतो असे प्रतिपादन भारतीय रिझर्व बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी केले आहे.सोमवारी ते पडघा येथील गिरीराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, पडघा पतसंस्थेचे अध्यक्ष तथा पडघा ग्राम पंचायत सरपंच अमोल बिडवी,सचिव दिनेश गंधे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
भारतात कृषी उद्योगाला मोठ्या प्रमाणात वाव असून त्याबाबतचे तंत्रज्ञान व यंत्रसामुग्री भारतात उपलब्ध होत असल्याने पतसंस्थांनी पुढाकार घेऊन जर कृषी प्रक्रिया उद्योग,त्या सोबतच कृषी मालाची साठवणूक करणारे शितगृह उभारले तर शेतकरी आपला शेतीमाल त्या ठिकाणी साठवणूक करून बाजारात चांगला भाव मिळेल त्या वेळेस ते उत्पन्न विकून चांगला नफा शेतकरी मिळवू शकतो व त्याच्या आर्थिक उन्नती साठी स्थानिक पतसंस्था मदत करणाऱ्या झाल्या तर या भारताचे चित्र बदलू शकते असे सांगत समाजातील शेवटच्या घटका पर्यंत पतसंस्था,विविध विकास सोसायटी पोहचत असल्याने केंद्र व राज्य सरकारने सुद्धा त्यांच्या पाठीशी भक्कम पणे उभे राहण्याची गरज आहे असे मत देखील शेवटी सतीश मराठे यांनी व्यक्त केले.
मन्नीपुरम, मुथुट यासारख्या परप्रांतातील सोने तारण कर्ज देणाऱ्या खाजगी कंपन्या राज्यातील पतसंस्थांवर अतिक्रमण करीत आहेत.फसव्या व्याजदरात अनेकांना भरडत असताना महाराष्ट्रातील पतसंस्थांनी आत्मपरीक्षण करून पतसंस्थांनी लॉकर सुविधा सुरू करण्यापेक्षा सुरक्षित सोने तारण कर्ज देण्याकडे आपला कल वाढवावा असे प्रतिपादन महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी केले.तर गिरीराज ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक ताळेबंदाचा हवाला देत कर्ज परतावा शून्य टक्के ठेवून भागधारकांना भरीव फायदा देत सहकार विभागाने घालून दिलेल्या नियमांपेक्षा अधिक चांगल्या सुरक्षित ठेवल्याने आपल्या भागधारकांचा विश्वास संपादन केल्या बद्दल गिरीराज पतसंस्थेच्या संचालक, कर्मचारी वर्गाचे महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते पतसंस्थेचे संस्थापक कै बीपीनचंद्र ठक्कर यांच्या कुटुंबियांसह ,संस्थेचे आजीमाजी संचालक ,कर्मचारी यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला .तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कराडकर यांनी केले.तर कार्यक्रमास मोठ्या संख्येने भागधारक खातेदार उपस्थित होते.