लोकल रेल्वेमधील महिलांच्या डब्यात घाण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 12:45 AM2020-08-20T00:45:15+5:302020-08-20T00:45:37+5:30
कल्याणहून सकाळी ८ वाजता निघालेल्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यात दरवाजा तसेच आसनावर घाण करून ठेवण्यात आली होती.
डोंबिवली : लोकलमधील महिलांच्या डब्यात बुधवारी सकाळी खाऊन झालेले अन्नपदार्थ तसेच घाण तशीच असल्याचे आढळून आले. त्यामुळे महिला प्रवाशांची कुचंबणा झाली.
कल्याणहून सकाळी ८ वाजता निघालेल्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यात दरवाजा तसेच आसनावर घाण करून ठेवण्यात आली होती. त्यामुळे महिलांची बसायला अडचण झाली. परिणामी, काही महिलांनी पुढील स्थानकात ती लोकल सोडून दुसरी लोकल पकडली. त्यामुळे त्यांना कामावर पोहोचण्यास विलंब झाला.
या प्रकाराबाबत काही महिलांनी सोशल मीडियावर उघडपणे टीका केली. रेल्वे प्रशासनाने स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. कोरोनाच्या काळात स्वच्छतेवर भर दिला गेला. परंतु, रेल्वेस्थानक, पादचारी पूल, स्कायवॉक आदी ठिकाणी घाण असते. त्यामुळे रेल्वेने सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवणे गरजेचे असल्याचे मत महिलांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी यासंदर्भात रेल्वे प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींकडेही गाºहाणे मांडत ही बाब रेल्वेच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची विनंती केली.
>सर्व्हर डाउन झाल्याने बसला फटका
लोकलने प्रवास करणाºया अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वेने क्यूआर कोड दिला आहे. त्याद्वारे मासिक पास, तिकीट सुविधा उपलब्ध आहे. परंतु, बुधवारी डोंबिवली रेल्वेस्थानकातील तिकीटघरातील सर्व्हर डाउन झाल्याने प्रवाशांना काही वेळ तिकीट व पास मिळू शकला नाही. त्यामुळे काही प्रवाशांनी रेल्वेच्या ओळखपत्रावर प्रवास केला.