मुख्यालयाच्या इमारतीचा सज्जा कोसळून आरोग्य अधिकाऱ्यांच्या गाडीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 05:03 PM2019-02-06T17:03:20+5:302019-02-06T17:05:06+5:30
ठाणे महापालिका मुख्यालयाच्या डागडुजीचे काम सुरु असतांना, बुधवारी सकाळी इमारतीचा सज्जा पडून झालेल्या दुर्घटनेत आरोग्य अधिकाºयांच्या शासकीय गाडीचे नुकसान झाले आहे.
ठाणे - ठाणे महापालिका मुख्यालयाच्या इमारतीचा सज्जा कोसळून पालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.आर.टी.केंद्रे यांच्या शासकीय गाडीचे नुकसान झाल्याची घटना बुधवारी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली. सुदैवाने पालिकेच्या आवारात कुणी नसल्याने जीवितहानी टळली. मात्र,या घटनेमुळे पुन्हा एकदा पालिका मुख्यालयाच्या इमारतीच्या निकृष्ठ बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ठाणे महापालिकेचे मुख्यालय असलेली पाचपाखाडी येथील इमारत १ आक्टोंबर १९८५ साली उभारण्यात आली. दरम्यान, बांधकाम जीर्ण झाल्याने पालिका मुख्यालयाच्या इमारतीची डागडुजी सुरु करण्यात आली आहे. सुट्टीच्या कालावधीत इमारतीची कामे सुरु असतात. असे असताना बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मुख्यालयाच्या पाठीमागील प्रवेशद्वारानजीक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील स्लॅबचा काही भाग आवरात उभ्या असलेल्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्याच्या गाडीवर पडल्याने गाडीच्या काचा फुटून नुकसान झाले. त्यानंतर, ठाणे मनपा आपत्कालीन विभागाने या भागात पार्कींग करण्यात आलेल्या इतर वाहनांना अन्यत्र हलविण्यात आले आहे. मात्र, या घटनेने पालिका मुख्यालयाच्या निकृष्ठ बांधकामाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.