महिला कायद्याचा गैरफायदा स्त्रियांकरिता त्रासदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 12:48 AM2021-01-05T00:48:01+5:302021-01-05T00:48:11+5:30
न्यायाधीश व्ही.एच.चव्हाण
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कायदे केले असून ते प्रभावी आहेत. महिलांवरील अत्याचारासंदर्भातील कायद्यांचा काही लोक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही प्रवृत्ती बदलण्याची गरज आहे. कायदे महिलांच्या बाजूने असले, तरी त्याचा गैरफायदा घेण्याची वृत्ती वाढल्यास ते भविष्यात महिलांसाठी त्रासदायक ठरू शकले, असे प्रतिपादन उल्हासनगर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व्ही.एच. चव्हाण यांनी केले.
माजी नगराध्यक्ष मनिषा वाळेकर यांनी महिलांसाठी असलेल्या कायद्यांचा वापर आणि त्याचा गैरवापर कसा होतो, याची माहिती दिली. गैरवापर झाल्यास त्याचा थेट परिणाम त्या महिलेवरच होतो. त्यामुळे कायद्यांचा गैरवापर होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले, तसेच कौटुंबिक वाद हे घरच्या घरी किंवा मध्यस्थीने मिटविणे हे शहाणपण असल्याचे मत व्यक्त केले, तोच धागा पकडून न्या.चव्हाण यांनी वरील प्रतिपादन केले. अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या महिलांची संख्या वाढत असली, तरी समाजाच्या एका विशिष्ट गटात आजही अनेक महिला मुकाटपणे अन्याय सहन करीत आहेत. त्यांची ही भूमिका महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ करणारी ठरत आहे, असे मतही चव्हाण यांनी व्यक्त केले.
अंबरनाथ नगरपरिषद व उल्हासनगर न्यायालय तालुका विधी समितीच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने पालिका सभागृहात महिला सक्षमीकरण मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चव्हाण बोलत होते.
ते म्हणाले की, महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी केलेल्या कायद्यांचा गैरफायदा घेण्याची वृत्ती वाढल्यास ते महिलांकरिता त्रास ठरू शकेल, हे आपले वैयक्तिक मत आहे.
न्यायाधीश के.एम.मराठे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाची आणि त्यांच्या कर्तृत्वाची माहिती दिली, तर न्यायाधीश बी. बावकर यांनी महिलांसाठी असलेल्या कायद्यांची माहिती देत त्या कायद्यांचा कोणत्या परिस्थितीत वापर करता येईल, याची कल्पना उपस्थित महिलांना दिली. न्यायाधीश एन.ए. माने यांनीही सावित्रीबाईच्या कार्याची माहिती दिली.
या कार्यक्रमाला न्यायाधीश एन.आर. गजभिये, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ.धीरज चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, पी.एल.व्ही. सदस्या चंदा गान, गुलाब जाधव, स्नेहल उपासनी आदी मान्यवर उपस्थित होते.
संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न गरजेचे- निंबाळकर
पालिकेच्या विधी विभागाच्या सल्लागार ॲड. साधना निंबाळकर म्हणाल्या की, सावित्रीबाईंनी जो संघर्ष केला, तो त्या काळातील समाजाच्या विरोधात होता. आजही परिस्थिती तशीच असून, केवळ संघर्ष हा समाजाबरोबर नसून घरातील माणसांसोबत आहेत. त्यामुळे हा संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.