नुकसानग्रस्त शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 10:50 PM2019-12-28T22:50:52+5:302019-12-28T22:50:59+5:30
महामार्ग दुरुस्तीचे काम; कंत्राटदाराने शेतात रसायन ओतले, विहिरीतील पाणीही काळे पडले
कसारा : मुंबई-नाशिक महामार्ग दुरु स्तीचे काम सुरू असतानाच कंत्राटदार कंपनी असलेल्या पीक इन्फ्रा या कंपनीच्या पोटकंत्राटदाराने रस्तादुरु स्तीसाठी आणलेले डांबरसदृश रसायन चिंतामणवाडी येथील शेतकऱ्याच्या जमिनीत व विहिरीत ओतून दिल्याने शेतकरी असलेल्या खंडू वाताडे यांच्या जमिनीतील काही पिके जळून गेली. तेथील विहिरीतही रसायन गेल्याने संपूर्ण विहिरीतील पाणी काळे पडले.
याप्रकरणी खंडू वाताडे यांनी तहसील कार्यालय व कसारा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. याप्रकरणी कसारा पोलिसांनी संबंधित कंत्राटदार कंपनीकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेली. दरम्यान, कंपनीचा एकही अधिकारी पोलीस ठाण्यात आला नव्हता. त्यांच्याऐवजी पोटकंत्राटदाराला पाठविले होते.
चाळीसहून अधिक पोते भातपीक देणारी सुपीक जमीन घातक रसायनामुळे नापीक झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. वाताडे हे नियमित भातपीक घेतात. परंतु, रसायनामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पोटकंत्राटदाराची दबंगगिरी
दरम्यान, शुक्रवारी कसारा पोलिसांनी पोटकंत्राटदारास (नाव कळू शकले नाही) घटनास्थळी चौकशीसाठी बोलावले असता वाताडे हे रसायनांची गाडी, कर्मचारी याबाबत माहिती देत असताना पोटकंत्राटदाराने पोलीस ठाण्यात आवाज वाढवत दबंगगिरी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, याप्रकरणी रस्त्यावरील डांबर रसायन व शेतात ओतलेले रसायन यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवून पुढील कारवाई करणार असल्याचे कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तात्रेय भोये यांनी सांगितले.
शेतकºयावर उपासमारीची वेळ
या रसायनामुळे माझ्या शेतजमिनीचे नुकसान होऊन माझ्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. माझ्या तक्रारअर्जावरून दोषींवर कारवाई करून मला न्याय देण्याची मागणी
खंडू वाताडे यांनी केली आहे.