निवृत्तीवेतनापासून शिक्षक ८ महिने वंचित
By admin | Published: March 16, 2017 02:40 AM2017-03-16T02:40:08+5:302017-03-16T02:40:08+5:30
ज्ञानदान करणाऱ्यांना निवृत्त वेतन मिळत नसल्याची बाब माजी आमदार डॉमणिक घोन्सालवीस यांनी उघडकीस आणली आहे.
वसई : ज्ञानदान करणाऱ्यांना निवृत्त वेतन मिळत नसल्याची बाब माजी आमदार डॉमणिक घोन्सालवीस यांनी उघडकीस आणली आहे. त्यांच्या स्रुषा ब्रीटा घोन्सालवीस सप्टेंबर महिन्यात सेवानिवृत्त झाल्या. त्यानंतर स्वत: घोन्सालवीस यांनी पाठपुरावा करूनही त्यांना अद्याप निवृत्तीवेतन मिळालेले नाही.
वयोवृद्ध माजी आमदार घोन्सालवीस, हे विधानस़भेत एकेकाळी विरोधी पक्षाचे मुख्य प्रतोद होते. त्यांनी यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून निवृत्तीवेतन आणि भविष्य निर्वाह निधी त्यांना मिळू शकलेला नाही.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधून निवृत्त होणाऱ्या शिक्षकांना निवृत्ती वेतन आणि भविष्य निर्वाह निधीसाठी उतारवयात अनेक हेलपाटे मारावे लागत आहेत.
पालघर जिल्हयातील अनेक शिक्षक सध्या निवृत्तीवेतन आणि भविष्यनिर्वाह निधीच्या प्रतिक्षेत असून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी माजी आमदार घोन्सालवीस यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली आहे. (प्रतिनिधी)