प्रीपेड रिक्षा रात्री नसल्याने गैरसोय
By admin | Published: June 9, 2015 10:52 PM2015-06-09T22:52:47+5:302015-06-09T22:52:47+5:30
भाडे नाकारणे बंद व्हावे व महिलांना रिक्षातून सुरक्षित प्रवास करता यावा या उद्देशाने सुरु केलेल्या प्रीपेड रिक्षा सेवेला आता महिना उलटला आहे.
ठाणे : भाडे नाकारणे बंद व्हावे व महिलांना रिक्षातून सुरक्षित प्रवास करता यावा या उद्देशाने सुरु केलेल्या प्रीपेड रिक्षा सेवेला आता महिना उलटला आहे. या सेवेचा महिलांना चांगला फायदा झाला आहे. परंतु रात्रीच्या वेळेस प्रवाशांना या रिक्षा उपलब्ध होत नसल्याने महिला प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. रात्री १० नंतर लांबचे भाडे मिळत नसल्याचे कारण प्रिपेड रिक्षा चालकांनी पुढे केले आहे. दुसरीकडे प्रादेशिक परिवहन विभागाने, प्रवासी आणि रिक्षा चालक यांच्यात समन्वय साधण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
ठाण्यात १ मे पासून या सेवेला सुरवात झाली आहे. या योजनेला आजही फारसा प्रतिसाद मिळतांना दिसत नाही. मात्र महिला प्रवाशांनी बऱ्यापैकी या रिक्षांचा वापर करायला सुरवात केली आहे. तरी ज्या उद्देशासाठी ही योजना ठाण्यात सुरु झाली तो उद्देशच सफल होत नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांमध्ये, विशेष करुन महिला प्रवाशांमध्ये कमालीची नाराजी आहे. अनेक महिलांना रात्री उशिरापर्यंत काम करावे लागत असल्याने घरी जाण्यासाठी त्यांना रिक्षाशिवाय पर्याय नाही. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून लांबचा प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या देखील जास्त असल्याने प्रीपेड रिक्षांची सर्वाधिक गरज ही रात्री १० नंतर आहे. मात्र याच वेळेस प्रवाशांना रिक्षा उपलब्ध होत नाहीत. त्याचवेळी जर प्रीपेड रिक्षा उपलब्ध होणार नसतील तर ही योजना सुरु करुन उपयोग काय? असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.
रात्री १० नंतर आणि दुपारी २ नंतर रिक्षा उपलब्ध होत नसल्याचे ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने सुद्धा मान्य केले आहे. प्रवाशांची वेळ आणि रिक्षाचालकांमध्ये योग्य समन्वय नसल्याने हे सर्व प्रकार घडत आहेत.