राष्ट्रवादीच्या बैठकीत विसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 12:02 AM2019-12-26T00:02:24+5:302019-12-26T00:02:55+5:30

‘जोडे मारो’चे पडसाद : माजी नगरसेवक, प्रदेश उपाध्यक्षांमध्ये खडाजंगी

Disagreement at Nationalist meeting in thane | राष्ट्रवादीच्या बैठकीत विसंवाद

राष्ट्रवादीच्या बैठकीत विसंवाद

Next

कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बुधवारी झालेल्या सुसंवाद बैठकीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याविरोधात केलेल्या ‘जोडे मारो’ आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटले. या आंदोलनावरून माजी नगरसेवक जव्वाद डोण आणि पवार यांचे कट्टर समर्थक प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. तर, कार्यकर्त्यांनी थेट जिल्हाध्यक्षांनाच लक्ष्य करत तक्रारी केल्या. तसेच कल्याण-डोंबिवलीतील राष्ट्रवादीची कमिटी बरखास्त करून नवी कमिटी स्थापन करण्याची मागणी केली. या सर्व गोंधळामुळे या बैठकीत सुसंवादाऐवजी विसंवादाचीच ठिणगी पडल्याचे दिसून आले.

कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात बुधवारी सकाळी ११ वाजता ही बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा समन्वयक आनंद परांजपे, प्रदेश उपाध्यक्ष हिंदुराव, प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ, जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, महिला आघाडीच्या माया कटारिया, सारिका गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या मनातील तीव्र भावना व्यक्त केल्या.
माजी नगरसेवक डोण हे बोलण्यास उभे राहताच त्यांना हिंदुराव यांनी रोखले. मात्र, डोण यांनी मला बोलू देण्याचा आग्रह धरताच त्यांच्यात ‘तू तू मैं मैं’ झाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊ न पवार यांनी सत्तास्थापन करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तेव्हा डोण यांनी कार्यकर्त्यांसह महापालिकेतील राष्टÑवादीच्या गटनेता दालनात पवार यांच्याविरोधात ‘चप्पल मारो’ आंदोलन केले होते. यावरून हे आंदोलन करणाऱ्यांना बोलण्याचा अधिकार नसल्याचा आक्षेप हिंदुराव यांनी घेतला. त्यावर हे आंदोलन करण्याचा मेसेज जिल्हा कमिटीकडून व्हॉट्सअ‍ॅपवर आला होता, असे स्पष्टीकरण डोण यांनी दिले. याची विचारणा हिंदुराव यांनी परांजपे यांना केली असता व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला मेसेज फॉरवर्ड केल्याचे स्पष्ट केले. मात्र, जे आंदोलन पवार यांच्या विरोधात झाले, तेच आंदोलन गणेश नाईकांच्या विरोधात का केले नाही. तेव्हा का संबंधितांची बोलती बंद झाली, असा सवाल हिंदुराव यांनी उपस्थित केला.
डोण यांनी यावर आक्रमक होत सांगितले की, मी केलेल्या आंदोलनाचे फोटो काढून पवार यांना पाठवून तक्रार करणे सोपे आहे. मात्र, पक्षाच्या पडत्या काळात मी पक्ष सोडला नाही. माझी पत्नी नगरसेविका आहे. तिला निवडणुकीत तीन हजार मते मिळाली. ज्यांच्याकडे दोन मते मिळवण्याची कुवत नाही, त्यांनी माझ्यासारख्या सच्च्या कार्यकर्त्यावर टीकाटिप्पणी करू नये. राजकीय घडामोडींच्या ओघात चूक झाली असल्यास मी ती मान्य करतो. याचा अर्थ मी पक्षविरोधी कृती केली, असा होत नाही. तर, हनुमंते यांनी आंदोलन करताना मला संबंधितांनी जिल्हाध्यक्ष म्हणून विचारणाच केली नाही. त्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले.

तेव्हा ही मंडळी कुठे होती - हनुमंते

पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष हनुमंते यांच्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षाची कमिटी डेड झाली आहे. पक्ष निरीक्षकपदाची जबाबदारी सुभाष पिसाळ पार पाडत होते. तेव्हा त्यांचा सगळ्यांवर वचक होता. आगामी महापालिकेच्या निवडणुका पाहता कमिटी बरखास्त करून नवी कमिटी स्थापन करण्याची मागणीही त्यांनी केली. त्यावर जिल्हाध्यक्ष हनुमंते यांनी पक्षाच्या पडत्या काळात आंदोलनास २० कार्यकर्तेही येत नव्हते. आता पक्ष सत्तेवर आल्यावर गर्दी वाढली आहे. पडत्या काळाच पक्ष टिकवून ठेवून वाढवण्याचे काम आपण केल्याचा दावा त्यांनी
यावेळी केला.

बोलघेवडे कार्यकर्ते पक्षाला नकोत - परांजपे : आनंद परांजपे म्हणाले की, मी कोणाला पदावरून हटवण्यासाठी आलेलो नाही. ही सुसंवाद बैठक आहे. त्यात सूचना हव्यात. तक्रारीचा सूर नको. भाजपच्या केंद्रीय नेत्यावर टीका करणाºयास त्याच्या प्रभागात १० मतेही मिळत नाहीत. केवळ बोलघेवडे कार्यकर्ते पक्षाला नकोत. निष्ठावान, कामे, वचक असलेल्यांचाच यापुढे पक्षाकडून विचार केला जाईल. महापालिकेच्या निवडणुकीला केवळ ३०० दिवस उरले आहे. त्यामुळे आतापासूनच कामाला लागा. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दरमहिन्यात एक बैठक घेऊन पक्ष संघटन मजबूत करण्यात येणार असल्याचे परांजपे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. कार्यकर्त्यांना काही समस्या असल्यास त्यांनी पक्षनेते जितेंद्र आव्हाड आणि माझ्याशी संपर्क साधावा, असे ते म्हणाले.

Web Title: Disagreement at Nationalist meeting in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.