कोरोना व्हायरसमुळे ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 07:48 PM2020-03-11T19:48:36+5:302020-03-11T20:32:44+5:30

ठाणे जिल्हा मुंबई शहरालागत असल्यामुळे अनेक पर्यटक ठाणे जिल्ह्यामार्गे प्रवास करतात, अथवा वास्तव्यास असतात

Disaster Management Act applied in Thane district - Rajesh Narvekar | कोरोना व्हायरसमुळे ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्याचा निर्णय

कोरोना व्हायरसमुळे ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्याचा निर्णय

Next

ठाणेठाणे जिल्ह्यात ‛कोरोना' व्हायरसचा  संसर्ग वाढू नये तसेच तात्काळ उपाययोजना करता याव्यात यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी  जिल्ह्यामध्ये आजपासून  ‛आपत्ती व्यवस्थापन कायदा' लागू केल्याची घोषणा केली आहे. 

ठाणे जिल्हा मुंबई शहरालागत असल्यामुळे अनेक पर्यटक ठाणे जिल्ह्यामार्गे प्रवास करतात, अथवा वास्तव्यास असतात. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि विषाणूंचा फैलाव होऊ नये म्हणून तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ठाणे  जिल्ह्यात हा कायदा लागू केल्याचे जाहीर केले आहे. 

या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार , जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पोलीस, आरोग्य, महानगरपालिका, जिल्हा परिषद, महसूल, अन्न व औषध प्रशासन, शिक्षण, औद्योगिक  विभाग तसेच सेवाभावी संस्था यांच्यावर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. सर्व विभागांनी जबाबदारीच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करून दैनदिन अहवाल सादर करावयाचा आहे. 

आपत्ती व्यवस्थापनामध्ये नेमलेल्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार करून ती पूर्णवेळ तैनात ठेवायची आहेत, संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था करायची आहे, तसेच स्वतंत्र माहिती कक्ष स्थापन करणे, जिल्ह्यातील रुग्णांचा शोध घेऊन त्यांना निरीक्षणाखाली ठेवणे, सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणे इत्यादी कामे केली जाणार असून हा कायदा लागू केल्यामुळे आता आवश्‍यकता भासल्यास खासगी रुग्णालय, डॉक्‍टर आणि रुग्णालयातील यंत्रसामग्री अधिग्रहित करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे. खाजगी रुग्णालयांनी सहकार्य करीत नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार संबधित विभागाला दिले आहेत.

मास्कची जादा दराने विक्री, औषधांची साठेबाजी केल्यास तात्काळ कारवाई करण्याचे अधिकार संबधित विभागाला दिले आहेत. सेवाभावी संस्थांनी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. पोलीस यंत्रणेने समाज माध्यमातून अफवा अथवा गैरसमज पसरविणारेशोधून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. सार्वजनिक कार्यक्रम आयोजकांचे प्रबोधन करावे असे आदेश जिल्हाधिकारी श्री नार्वेकर यांनी दिले आहेत. 

जनतेमध्ये भीतीयुक्त वातावरण तयार होऊ नये म्हणून व्यापक प्रचार, प्रसिध्दी, जनजागृती केली जात आहे. शाळा अंगणवाडी मध्ये हात धुण्याची प्रात्यक्षिके करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जागृती केली जात आहे. शहरात  वेगवेगळ्या ठिकाणी आजारासंबंधी प्रबोधनपर फलक, होर्डीग लावण्यात आले आहेत. चित्रपटगृह, केबल नेटवर्कद्वारे माहिती दिली जात आहे. बसस्थानक, रेल्वेस्टेशन, मॉल्स, हॉटेल्स, बँक, एटीएम आदी ठिकाणे वारंवार निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

सद्यस्थितीत शहर-जिल्ह्यात 'करोना'चा एकही रुग्ण नाही. तरीही खबरदारी म्हणून गर्दी होईल अशा सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. कौटुंबिक कार्यक्रमांनाही सार्वजनिक रुप आणू नका, तसेच मंदिर अथवा देवस्थानाला जाताना योग्य ती काळजी घ्या' घाबरू नका पण सतर्क रहा. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी  श्री नार्वेकर यांनी केले आहे.

Web Title: Disaster Management Act applied in Thane district - Rajesh Narvekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.