भिवंडीत कृषी विभागाची रोपवाटिका पाणी सिंचनासाठी चाळीस लाखांची उधळण; निकृष्ट बांधकाम करून भ्रष्टाचार झाल्याचा मनसेचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 06:22 PM2021-12-09T18:22:36+5:302021-12-09T18:22:46+5:30
विशेष म्हणजे २५ सप्टेंबर पर्यंत काम अर्धवट असताना परेश चौधरी यांच्या तक्रारी नंतर ठेकेदाराने प्रशासना सोबत हातमिळवणी करीत रंगरंगोटी करून काम पूर्ण झाल्याचे भासविले असल्याचा आरोप देखील मनसेचे चौधरी यांनी केला आहे .
- नितिन पंडीत
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील चाविंद्रा येथील कृषी विभागाच्या फळ रोपवाटीकेस पाणी सिंचनासाठी काँक्रेट पाण्याची टाकी व बोअरवेल उभारण्यासाठी तब्बल ४० लाख रुपये खर्च करण्यात आले असून या निधीतून २५ हजार लिटर साठवणूक क्षमता असलेल्या पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट व तकलादू केले असून योजना पूर्ण होण्या आधीच ठेकेदारास काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देत सर्व रक्कम अदा केल्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष परेश चौधरी यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून उघडकीस आणला आहे .
विशेष म्हणजे २५ सप्टेंबर पर्यंत काम अर्धवट असताना परेश चौधरी यांच्या तक्रारी नंतर ठेकेदाराने प्रशासना सोबत हातमिळवणी करीत रंगरंगोटी करून काम पूर्ण झाल्याचे भासविले असल्याचा आरोप देखील मनसेचे चौधरी यांनी केला आहे .
राज्य शासनाच्या कृषी विभागाने ४ फेब्रुवारी २०२० रोजी आदेश काढून भिवंडी चाविंद्रा येथील कृषी विभागाच्या फळरोपवाटीका बळकटीकरण योजने अंतर्गत पाण्याची टाकी व बोअरवेल उभारण्यास मंजुरी दिली असता ठाणे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागा मार्फत फळ रोपवाटिका असलेल्या ठिकाणी असलेल्या विहिरीतील पाणी साठविण्यासाठी २५ हजार लिटर साठवणूक क्षमता असलेली पाण्याची काँक्रीट टाकी उभारण्यात आली आहे त्यासाठी ३२ लाख ६४ हजार २१ रुपये व बोअर वेल बांधण्यासाठी ८ लाख ६३ हजार ४२ रुपये असे एकत्रित ४१ लाख २७ हजार ६३ रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली.
परंतु या ठिकाणी उभारलेली टाकी ही जुन्या काँक्रीट पिलर्स वरच उभारली असून त्यासाठी तकलादू साहित्य वापरात निकृष्ट काम केले असून त्या बाबत तक्रार केल्या नंतर सदरच्या टाकीस ठेकेदाराने प्लास्टर न करताच रंगरंगोटी केली असून बोअरवेल अजून लावली नसतानाच कृषी विभागाने ठेकेदारास सर्व रक्कम दिली असल्याचे पुरावे परेश चौधरी यांनी माहिती अधिकारात मिळविले असल्याचे स्पष्ट केले आहे.
फळरोपवाटीकेस पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा या साठी शासन आटापिटा करत असतांनाच रोपवाटीकेत विहीर असून तेथील पाणी थेट रोपवाटीकेत देणे शक्य असताना त्यासाठी लाखो रुपयांची उधळण करीत साठवणूक टाकी उभारण्याची गरजच काय , या भ्रष्ट कारभाराची शासनाने पुन्हा चौकशी करावी व ठेकेदारावर व बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी प्रतिक्रिया मनविसेनेचे परेश चौधरी यांनी दिली आहे.
तर पाण्याच्या टाकीकॅगे काम उत्तम झाले असून त्यात कोणताही भ्रष्टाचार झाला नाही अशी प्रतिक्रिया भिवंडी पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी सुदेश भास्कर यांनी दिली आहे.