दोन दिवस कटआॅफसह वीजपुरवठा खंडित
By admin | Published: November 10, 2015 12:43 AM2015-11-10T00:43:52+5:302015-11-10T00:43:52+5:30
उल्हास नदीतून जेवढ्या प्रमाणावर पाणी उचलण्याचे ठरले होते, त्यापेक्षा जास्त पाणीउपसा होत असल्याचा फटका कल्याण-डोंबिवलीकर नागरिकांना बसतो आहे
डोंबिवली : उल्हास नदीतून जेवढ्या प्रमाणावर पाणी उचलण्याचे ठरले होते, त्यापेक्षा जास्त पाणीउपसा होत असल्याचा फटका कल्याण-डोंबिवलीकर नागरिकांना बसतो आहे. यामुळे गेल्या आठवडाभरापासून कल्याण पूर्वेत पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याची माहिती महापालिकेने दिली. त्यातच कपातीचे दोन दिवस वगळता वीजेच्या समस्येसह कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हैराण आहेत.
केडीएमसीत प्रतिदिन ३०० तर २७ गावांसाठी ४०-५० एमएलडी पाणी लागते. त्यापैकी ४० एमएलडी पाणी एमआयडीसीकडून मिळते. उल्हास नदीतूनच ते पाणी उचलले जाते. सध्या मंगळवार आणि शनिवार हे दोन दिवस शहर हद्दीत तर बुधवार आणि शनिवार अशी दोन दिवस २७ गावांमध्ये पाणीकपात केली जाते. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांना आठवड्यातून चार वेळा पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे. असे असताना जे पाणी मिळते, ते देखील सुरळीत मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. कल्याण पूर्वेसारखीच स्थिती डोंबिवलीतील काही भागात भेडसावते. कल्याण पूर्वेतील पाणीटंचाईविरोधात गेल्या आठवड्यात मोर्चाही निघाला होता.