वाहनचालकांकडून शिस्त, नियमांची सर्रास पायमल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 04:37 AM2018-09-17T04:37:43+5:302018-09-17T04:38:29+5:30
वाहतुकीची कोंडी फोडता-फोडता शहर वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ येत आहेत.
कल्याण रेल्वेस्थानक मार्ग, शिवाजी चौक, वल्लीपीर रोड, मुरबाड रोड, रामबाग, टिळक चौक, सहजानंद चौक, लालचौकी, खडकपाडा, आधारवाडी, बेतुरकरपाडा, दुर्गामाता चौक, सुभाषचंद्र बोस चौक, तसेच कल्याण पूर्वेतील पूनालिंक रोड, तिसगाव नाका, काटेमानिवली, नेतीवली अशा सर्वच लहानमोठे रस्ते आणि चौकांमध्ये वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब होऊन बसली आहे. वाहतुकीची ही कोंडी फोडता-फोडता शहर वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ येत आहेत. वाहतूक पोलिसांनी ही कोंडी सोडविण्याचा कितीही प्रयत्न केला, तरीसुध्दा काही वाहनचालक आपण या रस्त्याचा कर भरत असल्याने हा रस्ता आपल्यासाठीच आहे, अशा तोऱ्यात वागताना दिसतात. रस्त्यात कुठेही वाहने उभी करतात. वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी केवळ वाहतूक पोलिसांनीच करावी असे नाही. ते आपलेही कर्तव्य आहे. मात्र, हे नियम आपल्यासाठी नाहीच, अशा अविर्भावात काही वाहनचालक वाहने हाकतात. या वाहनचालकांमुळेही वाहतूककोंडी होते.
एकीकडे वेशीबाहेरील कल्याणचे झपाट्याने नागरीकरण होत असताना दुसरीकडे मात्र त्याच्या नियोजनासाठी आवश्यक असणाºया कोणत्याच उपाययोजना मागील काही वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्ताधाºयांकडून झाल्या नाहीत. केवळ स्वार्थिक (स्वत:चे आर्थिक) हित आणि व्यक्तिगत उन्नती जपण्यातच येथील लोकप्रतिनिधी धन्यता मानत आले आहेत. शहराचे काय वाटोळे झाले तरी चालेल, मात्र आर्थिक लाभाच्या हव्यासाची आपली गाडी कोणत्याही कोंडीत अडकता कामा नये असा पवित्राच जणू काही लोकप्रतिनिधींनी घेतल्याचे दिसते. किमान शहर आणि शहरातील नागरिकांंंचे प्रश्न सोडवण्यासाठी तरी लोकप्रतिनिधींनी हा आपमतलबीपणा बाजूला ठेवण्याची गरज नागरिकांकडून अधोरेखित होत आहे. सद्यस्थितीचा विचार करता त्याला कितपत प्रतिसाद मिळेल, हे येणाºया काळातच स्पष्ट होणार असून, तोपर्यंत कल्याणकरांना कोंडीच्या नरकयातना भोगणे क्रमप्राप्त आहे. शहर वाहतुकीला शिस्त लावण्याबरोबरच नियमन करण्यासाठी कल्याणमध्ये २००३ मध्ये १३ ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली. मात्र, उद्घाटनानंतर काही महिन्यातच त्यावर खर्च करण्यात आलेले लाखो रुपये पाण्यात गेले.
छत्रपती शिवाजी महाराज चौक
छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मुरबाड रोड, रेल्वे स्टेशन येथून येणारी वाहने, भिवंडीकडून येणारी वाहने, पारनाका-टिळक चौक परिसरातून येणारी वाहने अशी चारही दिशेने सतत वाहतूक सुरू असते. त्यामुळे या भागात कोणत्याहीवेळी कोंडी दिसून येते. या चौकापासून महापालिका काही अंतरावरच आहे. महापौर, लोकप्रतिनिधी आणि पालिका आयुक्तांसह अन्य अधिकारी याच मार्गाने महापालिकेत जात असतात. या चौकातील वाहतूककोंडीचा सामना त्यांनाही करावा लागतो.
दुर्गामाता चौक
कल्याण-भिवंडी शहराला जोडणारा अरूंद दुर्गाडी पूल या भागातील वाहतूककोंडीचे मुख्य कारण आहे. दोन्ही बाजूला मोठे रस्ते असून, त्यातुलनेत हा अरूंद पूल आहे. े भिवंडीकडे जाणाºया आणि दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या चौकात वाहतूक कोंडी होत असते.
लालचौकीत गर्दी
आधारवाडीच्या दिशेने जाणारी वाहने, पारनाका येथून येणारी वाहने, भिवंडीहून येणारी-जाणारी वाहने या चौकात एकत्र येतात. याच ठिकाणी भिवंडीकडे जाणाºया त्याचप्रमाणे आधारवाडी, गांधारी या दिशेने जाणाºया रिक्षा थांबतात. तसेच, याठिकाणी शाळा असल्याने विद्यार्थ्यांची गर्दीही असते.
महात्मा फुले चौक
महात्मा फुले चौकाजवळ पालिकेचे रूग्णालय, न्यायालय तसेच तहसील कार्यालयही आहे. या चौकात बेकायदा वाहने उभी केली जातात. त्याचबरोबर मुरबाडकडे जाणाºया जीप गाड्यांबरोबरच खाजगी बसही या चौकात पाहायला मिळतात. भिकारी, गर्दुले आणि कचºयाचा सामनाही करावा लागतो.
सहजानंद चौक
शिवाजी चौकाजवळच सहजानंद चौक आहे. संतोषी माता रस्त्यावरून, काळातलाव येथून येणारी वाहने वाढल्याने चौकात कोंडी होते. या चौकात सकाळी कंपनीच्या तर सायंकाळी खासगी ट्रॅव्हल्सच्या बस उभ्या राहत असल्याने कोंडीत भर पडते.
नेताजी सुभाषचंद्र बोस चौक
कल्याण स्टेशनच्या दिशेने तसेच मुरबाडच्या दिशेने आणि उल्हासनगर येथून या चौकात वाहने येत असल्याने वाहनांची गर्दी नेहमीच असते.
चक्कीनाका
अंबरनाथ, उल्हासनगर तसेच कल्याण पश्चिमेतून या चौकात वाहने येत असतात. त्यामुळे गर्दी होते.
काटेमानिवली नाका
हा अत्यंत रहदारीचा चौक आहे. याठिकाणी शाळा, महाविद्यालय तसेच खाजगी क्लासेस आहेत. त्यातच या परिसरात अरूंद रस्ते असल्याने वाहतूक कोंडी होताना दिसते.
तिसगाव नाका
अरूंद रस्ते, खड्डे आणि रिक्षांची सुरू असणारी वर्दळ. त्याचबरोबर रिक्षातळ असल्याने यामुळे याठिकाणी नेहमीच वाहतूककोंडी होत असते.
नकोशी झाली कोंडी
मागील काही महिन्यांपासून वाहतूक कोंडीने कल्याणचे नागरिक अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. कल्याणमधील पत्रीपूल, दुर्गाडी पूल असो की शहाड पूल याठिकाणी तर कोंडीचा विस्फोट झाल्यासारखी भयानक स्थिती आहे. मुंब्रा बायपास अगोदरच बंद असल्याने कल्याणातील वाहतुकीवर मोठा ताण आला आहे. अशातच पत्रीपूलही बंद करण्यात आला आणि ही वाहतूक नियंत्रण करणे वाहतूक पोलिसांनाही कठीण होऊन बसले आहे. रुग्णवाहिका आणि शालेय बस या कोंडीत अडकून पडतात.
पादचाऱ्यांची ‘कसरत’
वाढलेली वाहने आणि अरूंद रस्ते यामुळे चौकांमध्ये एकावेळी चार वेगवेगळ्या मार्गाने वाहने येत असल्याने रस्ते पूर्णपणे बंद होतात. त्यामुळे या भागातून वाहने चालवणे वाहनचालकांना त्रासदायक ठरत आहे. पादचाºयांनाही अशा परिस्थितीत चालणे कठीण होते. रस्त्याच्या मध्ये पादचारी आणि चारही बाजूंनी धावणारी वाहने अशी अवस्था चौकांमध्ये पाहायला मिळते.
कोंडीची ठिकाणे : पश्चिमेतील कल्याण रेल्वे स्टेशन मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सहजानंद चौक, टिळक चौक, लालचौकी, खडकपाडा, आधारवाडी, बेतूरकरपाडा, दुर्गामाता चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, वल्लीपीर रोड, मुरबाड रोड, सिंडिकेट, रामबाग तसेच पूर्वेतील पूनालिंक रोड, तीसगाव नाका, चक्कीनाका, काटेमानिवली नाका, नेतीवली या परिसरातील चौकांमध्येही वाहतूक कोंडी होत असते.
दुतर्फा वाहने
कल्याण महापालिकेच्या परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूस सम आणि विषम तारखेनुसार दुचाकी पार्किंगची सोय करून देण्यात आली आहे. परंतु, सम आणि विषम तारखेचे भान न ठेवता नागरिकांकडून वाटेल त्या बाजूस दुचाकी लावण्यात येते. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शंकरराव चौकाकडे आणि शंकरराव चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणाºया गाड्यांचा जोर याठिकाणी जास्त असतो. रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या गाड्यांमुळे वाहतूककोंडीत भर पडते.
वाहतूककोंडीचे बळी
डिसेंबर २०१३ : पश्चिमेतील संतोषी माता मार्गावर कोंडी झाल्यानंतर वाहन पुढे नेण्यावरून झालेल्या वादात मयूर मेहता (५६) या दुचाकीस्वारावर दुसºया दुचाकी चालकाने चाकू हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
एप्रिल २०१५ : पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात राहणारे रमेश पांडुरंग मोरे (६८) या रेल्वेमधील सेवानिवृत्त अधिकाºयाचा कल्याणमधील वाहतूक समस्येने बळी घेतला. डॉक्टरांनी हदयविकाराची शक्यता वर्तवल्याने त्यांना रिक्षातून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या रुग्णालयात पोहचण्यासाठी सुमारे ४० मिनिटे लागली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता.
पालिका अधिकारी, पोलीस, वाहतूक पोलीस, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी यांची विशेष बैठक गणपतीनंतर बोलावणार आहोत. घनकचरा व्यवस्थापन विषय जसा मार्गी लावला, तसाच हा विषयही मार्गी लावू.
- विनिता राणे,
महापौर
वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार, खराब रस्ते यामुळे कोंडी होत आहे. शहरात दिवसभर सहाचाकी गाड्या (अवजड वाहने) दिवसाढवळ्या बिनधास्त वाहतूक करत असतात.
त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडते. यावर वाहतूक पोलिसांचे नियंत्रण नाही.
- मंदार हळबे,
विरोधी पक्षनेता
पालिकेकडून वाहतूक पोलिसांना वॉर्डन देत आहोत. शहरातील खड्डे भरण्याचे कामही सुरू आहे. मुंब्रा बायपास
सुरू झाल्यानंतर शहरातील वाहतूककोंडी कमी होईल.
- गोविंद बोडके,
आयुक्त, केडीएमसी
दुर्गाडी, पत्रीपूल, गांधारी, वालधूनी आणि शहाड या पाच पुलांवरून शहरात वाहने येत असतात. त्यातच शहरातील वाहनेही आहेत. नेताजी सुभाषचंद्र चौक, सहजानंद चौक याठिकाणी वन-वेचा गैरवापर होत आहे. वाहतूककोंडी कमी करण्यासाठी काही ठिकाणी बॅरिकेडस् लावण्यात आले आहेत. ओव्हरटेक करणाºया वाहनचालकांवर कारवाई
केली जात आहे. वाहन चालकांनीही शिस्तीचे पालन करणे गरजेचे आहे. तरच वाहतूककोंडी टाळता येईल. वॉर्डनची संख्या वाढविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- अनिल देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक