युती व आघाडीच्या चर्चेचे गुऱ्हाळ २ फेब्रुवारीपर्यंत
By admin | Published: January 23, 2017 05:26 AM2017-01-23T05:26:49+5:302017-01-23T05:27:08+5:30
महायुती किंवा आघाडी झाल्याची किंवा ती तुटल्याची घोषणा आताच केली, तर सर्व पक्षांत बंडखोरांचे पेव फुटेल या भीतीपोटी अर्ज
उल्हासनगर : महायुती किंवा आघाडी झाल्याची किंवा ती तुटल्याची घोषणा आताच केली, तर सर्व पक्षांत बंडखोरांचे पेव फुटेल या भीतीपोटी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवसापर्यंत म्हणजे २ फेब्रुवारीपर्यंत चर्चेचे गुऱ्हाळ सर्व पक्ष सुरू ठेवणार आहेत. राजकीय पक्षांचे जागावाटपावर एकमत होत नसले, तरी बंडखोरांना थोपवण्यावर मात्र एकमत झाल्याचे यातून दिसून आले. काही नेत्यांनीही खाजगीत याला दुजोरा दिला.
चार वॉर्डांचा एक प्रभाग होऊनही सर्वच पक्षांत इच्छुकांची संख्या वाढल्याने प्रस्थापित नगरसेवकांपुढील आव्हान आणि त्यांची धास्तीही वाढली आहे.
ओमी कलानी आणि त्यांच्या टीमच्या फुटीच्या शक्यतेने आघाडीही होत नाही आणि युतीही होत नाही, असी विचित्र परिस्थिती भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसपुढे आहे. त्यात रिपाइंचे गट, साई पक्ष, बसप यांची कोंडी होते आहे. या लहान पक्षांना भूमिका घेणे कठीण बनले आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या दुसरा र्प्लन तयार ठेवला असला तरी बंडखोरांची धास्ती कायम आहे. त्यामुळे एकीकडे कोंडी होत असली, तरी ओमी यांच्यामुळे सर्व पक्षांनी राजकीय सोयही झाली आहे. सारे काही अनिश्चित असल्याचे चित्र उभे करण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
सर्वच प्रभागातील इच्छुकांना पक्षांनी अर्ज दिले. त्यातून घसघशीत निधी उभा राहिला.
उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख ३ फेब्रुवारी असल्याने २ तारखेपर्यंत हे गुऱ्हाळ असेच सुरू ठेवायचे आणि शेवटच्या दिवशी ठरलेल्या उमेदवारांना ए-बी फॉर्मचे वाटप करण्याची तयारीही सुरू आहे.
याची कुणकुण लागल्याने बंडखोरांनीही विविध पक्षांशी, प्रसंगी अपक्ष म्हणून लढण्याची तयारी केली आहे. (प्रतिनिधी)