लोकसभेच्या कमी टक्केवारीच्या परिणामांवर राजकीय वर्तुळात चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 01:48 AM2019-05-01T01:48:49+5:302019-05-01T01:49:10+5:30
ठाण्यात घटलेल्या मतदानाचा फटका कोणाला आणि फायदा कोणाला आणि भिवंडी व कल्याणमध्ये वाढलेल्या मतदानाचा फायदा व तोटा कोणाला याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
ठाणे : लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष व निवडणूक विभागाने केलेल्या प्रसार, प्रचारानंतरही ठाण्यासारख्या सुशिक्षित मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत १.६४ टक्के घट झाली. तर कल्याण आणि भिवंडीत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. यामुळे ठाण्यात घटलेल्या मतदानाचा फटका कोणाला आणि फायदा कोणाला आणि भिवंडी व कल्याणमध्ये वाढलेल्या मतदानाचा फायदा व तोटा कोणाला याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
ठाण्यात ४९.२३ टक्के म्हणजेच २०१४ च्या तुलनेत १.६४ टक्के कमी मतदान झाले तर कल्याणमध्ये ४५.२८ टक्के मतदानाची नोंद झाली. गेल्यावेळी येथे ४२.८८ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत २.३९ टक्के मतदान वाढले आहे. तर भिवंडीत ५३.०७ टक्के मतदान झाले असून मागील निवडणुकीत ५१.६२ टक्के मतदान झाले होते. यावेळी त्यात १.४५ टक्के वाढ झाली आहे. असे असले तरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत प्रत्यक्ष मतदानाच्या आकड्याचा विचार करता ठाण्यात १ लाख १२ हजार ६९७ मतांची वाढ झाली आहे. भिवंडीत १ लाख २७ हजार ७४ मतांची वाढ झाली आहे. तर कल्याणमध्ये ६४ हजार ३९५ एवढ्या मतांची वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे यावेळी मतदानाची वेळ तासाभराने वाढविण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही ठाण्यातील मतांची टक्केवारी घटल्याचे दिसून येते. २०१४ मध्ये २० लाख ७३ हजार २५१ मतदारांपैकी १० लाख ५४ हजार ५७५ मतदारांनी (५०.८७ टक्के) मतदान केले होेते. यावेळी २३ लाख ७० हजार २७३ मतदारांपैकी ११ लाख ६६ हजार ८८६ मतदारांनी (४९.२३ टक्के ) हक्क बजावला. यावरून १.६४ टक्के मतदान कमी झाले असले तरी झालेल्या मतदार संख्येचा विचार करता १ लाख १२ हजार ६९७ मतदानाची प्रत्यक्ष भर पडली आहे. ठाण्यात मतदार यादीत घोळ झाल्याचे दिसून आले. कल्याण आणि भिवंडीमध्ये सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती होती. अनेकांची नावेच गहाळ होती. त्यामुळे अनेक मतदारांची ईच्छा असूनही, त्यांना मतदान करता आले नाही.
मतदारयाद्यांमध्ये यावेळीही ठिकठिकाणी त्रुटी आढळल्या. एकाच कुटुंबातील व्यक्तींचे मतदान वेगवेगळ्या केंद्रांवर देण्यात आले होते. या सर्व बाबींचा मतदानावर परिणाम झाला. शिवाय वाढत्या उन्हामुळे आणि सलग आलेल्या पाच दिवसांच्या सुट्यांचा मतदानावर परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.