ठाण्यात स्वाइनचे रुग्ण घटले, पण जिल्हा शासकीय रुग्णालयात लसीचा अजून पत्ताच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 10:21 PM2017-10-06T22:21:28+5:302017-10-06T22:21:50+5:30
जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात वाढल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही आतापर्यत 50 च्या घरात गेली आहे.
ठाणे : जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात वाढल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही आतापर्यत 50 च्या घरात गेली आहे. आता स्वाइनच्या रुग्णांमध्ये प्रचंड घट होताना अजून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वाइन फ्लूच्या लसीचा पत्ताच नाही. परंतु त्याची ऑर्डर दिली असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. ठामपा आरोग्य विभागाने लस उपलब्ध असल्याचा दावा केला.
ठाणे जिल्हा हा शहरी आणि ग्रामीण असा असून त्यामध्ये सहा महापालिका आणि दोन नगरपालिका तसेच दोन नगरपंचायतींचा समावेश आहे. 1 जानेवारी ते 4 ऑक्टोबरदरम्यान आतापर्यत जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे 978 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील अजून 101 रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत. जिल्ह्यात 46 आणि जिल्ह्याबाहेर तिघे असे 49 जण दगावले आहेत. त्यात सर्वाधिक 31 रुग्ण ठामपाच्या कार्यक्षेत्रात दगावले आहेत.
जुलै महिन्यात जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्याने ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने जिल्ह्यातील आरोग्य विभागाची बैठक बोलवली. तेव्हा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांना जनजागृती आणि लसखरेदी करण्याचे आदेश दिले. मार्च ते जुलैदरम्यान जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर एकूण 38 जणांचा बळी गेला होता. त्यापैकी जुलै महिन्यात 21 जण स्वाइनने दगावले. ऑगस्टमध्ये स्वाइनचा प्रादुर्भाव कायम होता. सप्टेंबर महिन्यात फ्लूसंबंधित लक्षणे दिसणा-या जिल्ह्यातील 17 हजार 56 जणांनी स्क्रिनिंग करून घेतले होते. त्यामध्ये 26 जणांना फ्लूची लागण झाल्याचे समोर आले. त्यातच या महिन्यात केडीएमसी कार्यक्षेत्रात एक महिलेचा स्वाइनने मृत्यू झाला असल्याची बाब पुढे आली आहे.
जिल्ह्यात स्वाइन फ्लू झपाटय़ाने वाढला, तितकाच तो झपाटय़ाने कमी होत आहे. त्यातच, ऑक्टोबर महिना उजाडला तरी, जिल्ह्याचे रुग्णालय असलेल्या ठाणे जिल्हा (सामान्य) शासकीय रुग्णालयात स्वाइन फ्लूची लस अद्यापही आलेली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
याबाबत दुजोरा देऊन लसीची ऑर्डर दिली आहे. ती लवकरच उपलब्ध होईल. - डॉ. बी.सी. केम्पीपाटील, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक
ही साथ कमी झाली असली, तरी ठामपाने ही लस खरेदी केली आहे. त्यामुळे 1 हजार 500 लस उपलब्ध असून त्यांना गरज असेल, त्यांनाच दिली जाणार आहे. - डॉ. आर.टी. केंद्रे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ठामपा