कुणबी शिवसैनिकांचे आज चिंतन, जिल्हा परिषदेच्या पदांमध्ये डावलल्याने असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 06:42 AM2018-02-01T06:42:05+5:302018-02-01T06:42:16+5:30

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पाठीशी उभे राहून, त्या पक्षाला भरघोस मतदान करून, तीन तालुक्यात शिवसेनेच्या पदरी घसघशीत जागा टाकूनही वेगवेगळ््या सभापतीपदांच्या निवडणुकीत कुणबी समाजाच्या पदरात अवघे एक पद पडल्याने या समाजात तीव्र असंतोष पसरला असून त्यावर चर्चा करण्यासाठी पडघा येथे गुरूवारी तातडीने चिंतन शिबिर होणार आहे.

Disgruntled by the displacement of Kunbi Shivsainiks today in the post of Zilla Parishad | कुणबी शिवसैनिकांचे आज चिंतन, जिल्हा परिषदेच्या पदांमध्ये डावलल्याने असंतोष

कुणबी शिवसैनिकांचे आज चिंतन, जिल्हा परिषदेच्या पदांमध्ये डावलल्याने असंतोष

Next

- मेघनाथ विशे
पडघा  - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पाठीशी उभे राहून, त्या पक्षाला भरघोस मतदान करून, तीन तालुक्यात शिवसेनेच्या पदरी घसघशीत जागा टाकूनही वेगवेगळ््या सभापतीपदांच्या निवडणुकीत कुणबी समाजाच्या पदरात अवघे एक पद पडल्याने या समाजात तीव्र असंतोष पसरला असून त्यावर चर्चा करण्यासाठी पडघा येथे गुरूवारी तातडीने चिंतन शिबिर होणार आहे. भिवंडी, कल्याण, शहापूर तालुक्यातील कुणबी समाजाचे पदाधिकारी त्याला उपस्थित राहणार असल्याने शिवसेनेतील खदखद बाहेर पडण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा परिषदेवर निवडून आलेले शिवसेनेचे सदस्यही या बैठकीत सहभागी होणार असल्याने पक्षात उघडउघड दोन गट तयार झाले आहेत. कुणबी समाजातील शिवसैनिकांनी भिवंडी, शहापूर व कल्याण तालुका संपर्कप्रमुख विष्णू चंदे यांच्या पडघा येथील कार्यालयात ही बैठक बोलावली असून सत्ताधारी सेनेवरच हा समाज नाराज झाल्याने आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांत शिवसेनेला याची मोठी किंमत मोजावी लागेल, अशी भावना या नेत्यांत आहे.
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रभावशाली लोकसंख्या म्हणून कुणबी समाजाकडे पाहिले जाते. कुणबी समाजाचा कौल कसा असेल, यावरच जिल्हा परिषदेची समीकरणे अवलंबून होती. शिवसेनेच्या पारड्यात कुणबी समाजाची मते मोठ्या संख्येने पडली. त्यातच कुणबी सेनेनेही भाजपाला विरोधी म्हणून शिवसेनेला उघड पाठिंबा दिला होता. त्यातूनच जिल्हा परिषदेवर शिवसेना-राष्ट्रवादीची सत्ता आली. मात्र समाजाला हवा तसा सत्तेच्या पदांचा वाटा मिळाला नाही. आरक्षण गृहीत धरले तरी अध्यक्ष, उपाध्यक्ष, चार विषय समित्या अशा सहा जागांपैकी आगरी समाजाला सर्वाधिकचे तीन, आदिवासी समाजाला दोन, तर कुणबी समाजाला अवघे एक पद मिळाले. त्यातून ही धुसफूस वाढली. जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष सुभाष पवार हे समाजातील एकमेव सदस्य आहेत, पण हे पद राष्ट्रवादीच्या कोट्यातील आहे. भिवंडी तालुक्यात चारपैकी तीन समित्यांतील एका जागेवर तरी कुणबी समाजातील व्यक्तीची निवड होईल, असे वाटत होते. मात्र शिवसेनेने तिन्ही आगरी समाजातील उमेदवार दिले. यामुळे कुणबी गट नाराज असून कल्याणचे तालुकाप्रमुख वसंत लोणे, माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ जाधव, संपर्कप्रमुख विष्णू चंदे, विभागप्रमुख के. बी. विशे यांच्या नेतृत्वाखाली समाजावरील अन्यायाविरोधात दुपारी चार वाजता चिंतन शिबिर होणार आहे.
जिल्हा परिषदेत पाठिंबा मिळावा म्हणून शहापूरमध्ये शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला पंचायत समितीच्या सत्तेत वाटा दिला. त्याविरोधात तेथे पक्षात राडा झाला होता. नंतर भिवंडीतही स्वीकृत सदस्यावरून पक्षात बंड झाले होते. त्यापाठोपाठ पक्षातील अन्य समाजांच्या वाढत्या वर्चस्वाला आव्हान देत कुणबी समाज आक्रमक पवित्रा घेत उभा ठाकल्याने शिवसेनेतील आव्हान वाढले आहे.

मतपेढी गमावण्याची भीती

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कुणबी समाजाची संख्या लक्षणीय आहे. मध्यंतरीच्या काळात का समाज काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिला. नंतर कुणबी सेना त्या पक्षात विलीन झाली. पण अन्य पक्षांनी समाजाचा वापर करून घेतला, पण पदे दिली नाहीत म्हणून त्या समाजाने यावेळी शिवसेनेला पाठिंबा दिला, पण त्या पक्षानेही मतपेढी म्हणून समाजाचा वापर केल्याची नाराजी या समाजात आहे. मुरबाडमध्ये या समाजाने किसन कथोरे यांना पाठबळ दिले. त्यामुळे तेथे भाजपाच्या यशात वाढ झाली. त्यामुळे शिवसेनेने तातडीने पदे दिली नाहीत, तर ही मतपेढी गमावण्याची भीती आहे, असे या समाजातील नेत्यांना वाटते.

आगरी समाजाचे वर्चस्व

शिवसेनेत मराठा आणि आगरी समाजाचे प्राबल्य वाढत असल्याने त्याबज्जल कुणबी समाजात नाराजी आहे. पक्षातील पद वाटपात आणि प्रत्यक्ष सत्तेची पदे देण्यातही या समाजाला डावलले गेल्याची भावना आहे. त्यातच कुणबी समाजात आरक्षणाचा वाटा हवा; पण या समाजात रोटी-बेटी व्यवहार करण्याची तयारी नाही, यामुळेही हा समाज दुखावला गेला. त्यानंतरही या समाजाने शिवसेनेला पाठबळ दिले. पण त्या बदल्यात समाजाच्या पदरी काही पडले नसल्याची भावना तीव्र बनल्याने त्याचे पडसाद या बैठकीत उमटण्याची चिन्हे आहेत.

मुरबाड, अंबरनाथची बैठकही दोन-तीन दिवसांत

मुरबाडमध्ये कुणबी समाज मोठ्या प्रमाणात आहे. तेथे शिवसेनेला पार यश मिळाले नसले, तरी त्या आणि अंबरनाथ तालुक्यातील कुणबी समाजाच्या शिवसैनिकांची बैठकही पुढील दोन-तीन दिवसांत घेतली जाईल. शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांचा पद वाटपातील निर्णय पूर्ण चुकला आहे. भिवंडी, शहापूर आणि कल्याणमध्ये कुणबी समाजामुळे चांगले यश मिळूनही तिन्ही तालुक्यातील पदे आगरी समाजाला दिली. त्या समाजाला झुकते माप देण्यात आले. सर्वसमावेशक विचार करून कुणबी समाजाला एक तरी सभापतीपद द्यायला हवे होते, अशी स्पष्ट भूमिका विष्णू चंदे यांनी मांडली.
 

Web Title: Disgruntled by the displacement of Kunbi Shivsainiks today in the post of Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.