शिल्पकार भाऊ साठे पद्म पुरस्कारापासून वंचित, मुख्यमंत्री, लोकसभाध्यक्ष यांच्याकडे शब्द टाकूनही पदरी निराशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 07:15 AM2018-01-30T07:15:52+5:302018-01-30T07:16:07+5:30
जागतिक कीर्तीचे शिल्पकार भाऊ साठे यांना भारत सरकारकडून पद्म पुरस्कार मिळावा, याकरिता कल्याण सार्वजनिक वाचनालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याशी पत्रव्यवहार करून व सातत्याने पाठपुरावा करूनही यंदाच्या पद्म पुरस्कारांमध्ये साठे यांचा समावेश
- जान्हवी मोर्ये
कल्याण : जागतिक कीर्तीचे शिल्पकार भाऊ साठे यांना भारत सरकारकडून पद्म पुरस्कार मिळावा, याकरिता कल्याण सार्वजनिक वाचनालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याशी पत्रव्यवहार करून व सातत्याने पाठपुरावा करूनही यंदाच्या पद्म पुरस्कारांमध्ये साठे यांचा समावेश न झाल्याने कल्याणमधील कलाकार व रसिक नाराज झाले आहेत.
साठे यांचे वय ९१ वर्षे असून सरकारकडून शिल्पकलेतील त्यांच्या योगदानाची दखल घेतली जाणार की नाही, असा सवाल शिल्पकलाप्रेमींसह कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाने केला आहे. त्यांचा सवाल खरोखरच रास्त आहे. यंदाच्या वर्षी पद्म पुरस्काराच्या यादीत साठे यांचे नाव का समाविष्ट झाले नाही. किमान पुढील वर्षी २६ जानेवारीला भाऊंना पद्म पुरस्कार घोषित होणार का, असा सवाल केला जात आहे.
कल्याणमध्ये राहणाºया शिल्पकार साठे यांनी दिल्लीत १९५४ साली गांधीजींचे शिल्प उभारले. त्यानंतर, २०१४ मध्ये गुजरात दांडी येथे गांधींचे शिल्प उभारले. साठे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, पंडित जवाहरलाल नेहरू, राणी एलिझाबेथ, लॉर्ड माउंटबॅटन, नेताजी सुभाषचंद्र बोस, अटलबिहारी वाजपेयी, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची शिल्पे उभारली आहेत. शिल्प तयार करण्याबाबत त्यांनी ‘आकार’ हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक शिल्पकलेच्या अभ्यासकांना मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांत उपलब्ध आहे. त्यांनी डोंबिवली औद्योगिक निवासी भागात एक शिल्पालय उभारले आहे. त्यात त्यांची शिल्पे ठेवली आहेत. शिल्पकलेत करिअर करू इच्छिणाºया भावी शिल्पकारांना मार्गदर्शक ठरू शकतात. साठे हे कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाचे सभासद आहेत. त्यांचे पणजोबा रावबहादूर साठे यांनी कल्याण सार्वजनिक वाचनालय १८६४ मध्ये सुरू केले. साठे हे कल्याण गायन समाजाचे काही काळ अध्यक्ष होते. या कलासक्त शिल्पकाराचा भारत सरकारने सन्मान करणे अपेक्षित आहे. वाचनालयाच्यावतीने साठे यांना पद्म पुरस्कार मिळण्याकरिता १३ सप्टेंबर २०१७ रोजी सरकारशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संबंधित सचिवाकडे याबाबतचे सर्व पुरावे देऊन चर्चा केली होती. दीड महिन्यापूर्वी लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन एका शैक्षणिक कार्यक्रमानिमित्त कल्याणच्या शाळेत आल्या असताना त्यांच्याकडेही साठे यांना पद्म पुरस्कार मिळण्याकरिता शब्द टाकण्याची विनंती कल्याणमधील कलावंत, रसिक यांनी केली होती. कल्याण-डोंबिवली महापालिकेनेही पद्म पुरस्कारासाठी सरकारदरबारी शिफारस करण्याचे मान्य केले होते. या सगळ्या पाठपुराव्यानंतरही साठे यांचे नाव पद्म पुरस्काराच्या यादीत समाविष्ट झाले नाही. स्वत: साठे यांचा रा.स्व. संघ परिवाराशी निकटचा संंबंध आहे. त्यामुळे आता किमान पुढील वर्षी तरी त्यांच्या नावाचा विचार होणार का, असा प्रश्न आहे.
सत्ताबदल होऊनही काहीही साध्य नाही
काही वर्षांपूर्वी उल्हासनगरच्या चांदीबाई कॉलेजमध्ये ज्येष्ठ गायिका परवीन सुलताना आल्या होत्या. त्यावेळी पद्म पुरस्कार कसे व कोणाला दिले जातात. त्यासाठी कोणताही निकष वापरला जात नाही. त्यामुळे देशातील खरे पद्म पुरस्काराचे मानकरी हे कसे पुरस्कारापासून वंचित राहतात, अशी टीका सुलताना यांनी केली होती.
सुलताना यांचा रोख हा तत्कालीन केंद्र सरकारवर होता. मात्र, आता स्वच्छ व पारदर्शकतेचा आग्रह धरणारे सरकार सत्तेवर आल्यावरही पद्म पुरस्काराबाबत शंकेला वाव असेल, तर सत्ताबदल होऊनही काही साध्य झाले नाही, असेच म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया काही कलाकारांनी केली.