लोकायुक्तांच्या आदेशाचा अनादर; ठाणे काँग्रेसचा आरोप
By अजित मांडके | Published: February 7, 2024 06:40 PM2024-02-07T18:40:24+5:302024-02-07T18:41:54+5:30
आयुक्तांची भेट घेऊन पत्राद्वारे मागणी केलेली आहे, जर याबाबत योग्य भूमिका आयुक्तांनी घेतली नाही तर काँग्रेस रस्त्यांवर उतरून आंदोलन करेल असा इशारा त्यांनी शेवटी दिला.
ठाणे : लोकायुक्तानी दिलेल्या आदेशानंतरही अनधिकृत बांधकामावर कर आकारणी व पाणीपुरवठा करण्यात आला असून संबंधित जबाबदार अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी बुधवारी ठाणे शहर काॅग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
ठाणे शहर काॅग्रेसच्या वतीने एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शहर काॅग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे, जेष्ठ उपाध्यक्ष भालचंद्र महाडिक, प्रवक्ते राहुल पिंगळे, महिला अध्यक्षा स्मिता वैती व मंजूर खत्री आदि पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना चव्हाण यांनी सांगितले अनधिकृत बांधकामावर आळा बसावा म्हणून लोकायुक्त यांच्याकडे तक्रार केली होती.
आमच्या या तक्रारींची दखल घेऊन लोकायुक्त यांनी महानगरपालिकेला आदेश दिले होते की,अनधिकृत बांधकामावर यापूढे पाणी पुरवठा, कर आकारणी तसेच वीजपुरवठा करण्यात येऊ नये परंतु लोकायुक्तांनी दिलेल्या आदेशानंतरही मागील दोन वर्षांत झालेल्या सर्वच अनधिकृत बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्यांना करआकारणी व पाणीपुरवठा करण्यात आलेला आहे. आताही नवीन आयुक्तांनी पून्हा एकदा याबाबत सर्व सहाय्यक आयुक्तांना आदेश दिले आहेत मात्र मागील दोन वर्षांत शेकडो अनधिकृत बांधकाम झालेल्या इमारतिंचा पाणीपुरवठा, करआकारणी करण्यात आली. याची पूर्ण चौकशी करण्यात यावी व याकाळात जे जे अधिकारी होते, त्यांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी जर कोणी निवृत्त झाले असतील तर त्याची पेन्शन थांबविण्यात यावी अशी मागणी केली आहे. आयुक्तांची भेट घेऊन पत्राद्वारे मागणी केलेली आहे, जर याबाबत योग्य भूमिका आयुक्तांनी घेतली नाही तर काँग्रेस रस्त्यांवर उतरून आंदोलन करेल असा इशारा त्यांनी शेवटी दिला.