कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये ठाण्यात ‘पद्मावत’ प्रदर्शित: पहिल्या दिवशी पे्रक्षकसंख्या रोडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 08:55 PM2018-01-25T20:55:47+5:302018-01-25T21:06:19+5:30
‘पद्मावत’ या चित्रपटाला झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून ठाण्यातील विविध सिनेमागृहांमध्ये तो प्रदर्शित झाला. अनेकांनी दबक्या पावलांनीच सिनेमागृहात प्रवेश करुन ‘पद्मवात’ पाहण्याचा आनंद लुटला.
ठाणे : संपूर्ण देशभरात प्रदर्शनापूर्वीच वादग्रस्त ठरलेला ‘पद्मावत’ चित्रपट गुरुवारी तणावपूर्ण वातावरणात ठाणे शहरात प्रदर्शित झाला. चित्रपटाला काही ठरावीक संघटनांनी केलेला विरोध लक्षात घेता ठाण्यातील सर्वच सिनेमागृहांबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
चित्रपटाला झालेल्या विरोधामुळे या चित्रपटाच्या प्रेक्षकांची संख्याही रोडावल्याचे चित्र पहिल्याच दिवशी पाहायला मिळाले. अनेक प्रेक्षकांनी पोलीस बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर सिनेमागृहाच्या बाहेरूनच काढता पाय घेतला. कोरम मॉलमधील चित्रपटगृहात गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अवघे तीनच प्रेक्षक असल्यामुळे सकाळी ९ चा खेळ बंद करण्याची नामुश्की सिनेमागृहचालकावर आली. ठाण्यातील बहुतेक सिनेमागृहे मल्टीप्लेक्स झाली असून या सर्वच सिनेमागृहांबाहेर सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे. बुधवारी क्षत्रिय सेनेच्या वतीने सिनेमाला जोरदार विरोध करण्यात आला. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून २० आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सुरुवातीला पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्यामुळे क्षत्रिय समाजाच्या वतीने ठाण्यातील कोणत्याही सिनेमागृहामध्ये हा चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी निवेदन दिले होते. त्यानंतर, कोरम मॉलच्या बाहेर मूक निदर्शने करून चित्रपटाचे पोस्टर फाडण्यात आले. या सर्वच पार्श्वभूमीवर प्रेक्षकांची झडती घेऊनच त्यांना सिनेमागृहांमध्ये पोलिसांकडून सोडण्यात येत होते. कोरम मॉलमधील सकाळी ९ नंतरच्या शो ला प्रेक्षकांची ब-यापैकी गर्दी जमली होती.
चित्रपटामध्ये काहीच वादग्रस्त नसल्याची प्रतिक्रि या इटर्निटीमधून बाहेर पडलेल्या प्रेक्षकांनी व्यक्त केली. बºयाच प्रेक्षकांनी तर हा एक प्रकारे पब्लिसिटी स्टंट असल्याचेही मत व्यक्त केले.