भिवंडी लोकसभेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर
By मुरलीधर भवार | Published: April 12, 2024 07:07 PM2024-04-12T19:07:42+5:302024-04-12T19:07:57+5:30
दुराव्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला फटका बसू नये, यासाठी दोन्ही पक्षांकडून डॅमेज कंट्रोल करण्याची भूमिका घेण्यात आली होती.
कल्याण- भिवंडी लोकसभेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली नाराजी अखेर दूर झाली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचे एकदिलाने काम करण्याचा निर्धार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
भिवंडी लोकसभेत मागील काही दिवसांपासून भाजपा आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गैरसमजांमुळे दुरावा होता. मात्र या दुराव्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला फटका बसू नये, यासाठी दोन्ही पक्षांकडून डॅमेज कंट्रोल करण्याची भूमिका घेण्यात आली होती.
भविष्यात दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांमध्ये काहीही गैरसमज झाल्यास थेट आमच्याशी संपर्क साधा, अशा सूचना यावेळी पदाधिकाऱ्यांना मंत्री चव्हाण आणि खासदार शिंदे यांनी दिल्या.
तसेच ही निवडणूक एका व्यक्तीची नसून देशाची आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला मतदान करणे गरजेचे आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गैरसमज बाजूला ठेवून पूर्ण ताकदीने महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काम करावे, असे आवाहन यावेळी मंत्री चव्हाण आणि खासदार शिंदे यांनी केले.