प्रभागात कचऱ्यावर विकेंद्रीत व शास्त्रोक्त पध्दतीने लावली जाणार विल्हेवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 01:48 PM2018-03-17T13:48:03+5:302018-03-17T13:48:03+5:30
ठाणे महापालिकेने आता प्रभाग समिती अंतर्गत कचऱ्यावर विकेंद्रीत व शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात सहा प्रभाग समितीअंतर्गत कंपोस्टींग पीट्स उभारण्यात येणार आहेत.
ठाणे - शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर त्याच परिसरात विकेंद्रीत व शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नौपाडा, उथळसर, कळवा, मुंब्रा, वागळे आणि लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समितीमध्ये कंम्पोस्टींग पीट्स उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सहा प्रभाग समितीमध्ये प्रत्येकी ५०० किलोक्षमतेचे हे पीट उभारले जाणार आहेत.
ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला ८०० मेट्रीक टन कचऱ्याची निर्मिती होत आहे. हा कचरा दिवा येथील डम्पींगवर टाकला जात आहे. तसेच महापालिकेच्या वतीने मागील वर्षभरात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. काही प्रकल्प सुरु झाले असून काहींवर कार्यवाही सुरु आहे. याशिवाय प्रत्येक सोसायटीने आपला कचरा मार्गी लावावा यासाठी देखील पालिकेने पावले उचलली आहेत. यापुढे जाऊन प्रत्येक प्रभाग समिती मधील निर्माण होणारा कचरा हा त्याच ठिकाणी शास्त्रोक्तपध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत. त्यानुसार शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर त्याच परिसरात विकेंद्रीत व शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
त्यानुसार वागळे आणि लोकमान्य- सावरकरनगर प्रभाग समिती अंतर्गत या पध्दतीनुसार ५०० किलो क्षमतेचे १० पीट व १ टन क्षमतेचे १५ पीट असे एकूण २५ केपोस्टींग पीट्स उभारले जाणार आहेत. यासाठीची निविदा प्रक्रिया देखील अंतिम झाली आहे. त्यानुसार या कामी एकूण २३ लाख ६९ हजार ४८६ रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. याच पध्दतीचे पीट्स कळवा, मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत देखील उभारले जाणार असून त्यानुसार ५०० किलो क्षमतेचे ९ पीट व १ टनक्षमतेचे १० पीट असे एकूण १९ पीट्स उभारले जाणार आहेत. यासाठी १७ लाख ९ हजार ६४२ रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तर नौपाडा, उथळसर प्रभाग समितीमध्ये देखील ५०० किलो क्षमतेचे १० पीट व १ टनक्षमतेचे १५ पीट असे एकूण २५ कंपोस्टींग पीट्स उभारले जाणार आहेत. यासाठी २३ लाख २ हजार ३१० रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यानुसार हे तीन प्रस्ताव येत्या २० मार्चच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आले आहेत.