कल्याण पूर्वेत मच्छीमार विरुद्ध शिवसेना वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 11:47 PM2020-02-11T23:47:05+5:302020-02-11T23:47:15+5:30
कारवाईवरून वादंग : कोळी महासंघाचा आंदोलनाचा इशारा
कल्याण: पूर्वेकडील महत्वाचा मानला जात असलेल्या ‘यु’ टाइप रस्त्यालगत असलेल्या पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्यावरून मच्छीमार विरुद्ध शिवसेना असा वाद निर्माण झाला आहे. या कारवाईमुळे मच्छी विक्रेत्यांच्या उदरनिर्वाहावर टाच आल्याचा आरोप राज्य कोळी महासंघाचे उपनेते देवानंद भोईर यांनी केला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
फेरीवाले आणि टपरीधारकांच्या झालेल्या अतिक्रमणाच्या निषेधार्थ शुक्रवारी झालेल्या उपोषण आंदोलनात कल्याण पूर्व विधानसभा शिवसेना सहसंपर्क प्रमुख शरद पाटील यांच्यासह पूर्वेतील सेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सेना, महिला आघाडी, राष्ट्र कल्याण पार्टी आणि विविध सामाजिक संघटना सहभागी झाले होते. दरम्यान अतिक्रमणावर कारवाई केली जाईल या केडीएमसी प्रशासनाच्या लेखी पत्रानंतर संध्याकाळी आंदोलन मागे घेतले. मात्र अतिक्रमणावर सुरू झालेल्या कारवाईमुळे आता नवा वाद उभा राहिला आहे.
शिवसेनेचे शरद पाटील यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांना हाताशी धरून मच्छी मार्केटवर कारवाई करण्यास अधिकाऱ्यांना भाग पाडल्याचा आरोप राज्य कोळी महासंघाचे भोईर यांनी केला आहे. पाटील यांचे या परिसरात हॉटेल आहे त्या व्यवसायात मच्छी विक्रेत्यांचा अडथळा येतो म्हणून कोळी-आगरी समाजाची कुटुंबे उदध्वस्थ करण्याचे षडयंत्र पाटील यांनी रचले, असा आरोप भोईर यांनी केला. कोळसेवाडीत शिवसेनेची शाखा स्थापन होण्याआधीपासून मच्छी विक्रेते आपला उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्याऐवजी शिवसेना या समाजाला उदध्वस्थ करीत आहे, असे भोईर म्हणाले.
भोईर यांचे आरोप निरर्थक आहेत. माझ्या हॉटेलचा आणि पदपथावरील अतिक्रमणावरील कारवाईचा काहीही संबंध नाही. पदथावर जे अतिक्र मण होईल ते हटविण्याची कारवाई महापालिकेने सुरू केलेली आहे. नागरीकांसाठी पदपथ हे मोकळेच असले पाहिजेत. त्यावर अतिक्रमण करणारे भाजी विक्रेते असतील तर त्यांच्यावरही कारवाई झालेली आहे. भविष्यात जेव्हा रस्ता रूंदीकरण होईल तेव्हा त्याठिकाणी कोणतेच अतिक्रमण राहणार नाही.
- शरद पाटील, सहसंपर्क प्रमुख, शिवसेना