उल्हासनगरात दुचाकीस्वार, रिक्षाचालक व पोलिसांत वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:39 AM2021-04-11T04:39:11+5:302021-04-11T04:39:11+5:30
उल्हासनगर : व्यापाऱ्यांचा विरोध असतांना शहरात वीकेंड लॉकडाऊनला १०० टक्के प्रतिसाद मिळाल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. काही ठिकाणी दुचाकीस्वार, रिक्षाचालक ...
उल्हासनगर : व्यापाऱ्यांचा विरोध असतांना शहरात वीकेंड लॉकडाऊनला १०० टक्के प्रतिसाद मिळाल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. काही ठिकाणी दुचाकीस्वार, रिक्षाचालक व पोलिसांत नियमांचे उल्लंघन केल्यावरून वाद झाला. तर दुसरीकडे सफाई कामगार, पोस्टमन, गॅस वितरणचे काम नेहमीप्रमाणे सुरू होते.
वीकेंड लॉकडाऊनच्या पूर्वसंध्येला विठ्ठलवाडी पोलिसांसह इतर पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या हद्दीत रूटमार्च काढून लॉकडाऊनबाबत नागरिकांना माहिती देऊन नागरिक व व्यापाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. शहाड फाटक परिसर, बिर्ला गेट चौक, शहाड, उल्हासनगर व विठ्ठलवाडी पोलीस ठाणे रेल्वे स्टेशन, गोलमैदान, शिवाजी चौक, १७ सेक्शन चौक, श्रीराम व पवई चौक, नेहरू चौक, व्हीनस चौक, भाटिया चौक, नेताजी चौकसह मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट होता.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून एक वृद्ध ऐन दुपारी हातात जेवण घेऊन जात असताना चक्कर येऊन रस्त्यावर पडला. स्थानिक नागरिक व पोलिसांनी वृद्धाला उचलून सावलीत बसून पाणी दिले. त्यांची सविस्तरपणे चौकशी करून घरी सोडण्याची व्यवस्था केली.
दरम्यान, वीकेंड लॉकडाऊन यशस्वी होण्यासाठी भर उन्हात पोलीस रस्त्यावर आपले कर्तव्य बजावत होते. मात्र त्यांच्या सोबतीला नेहमी असलेले महापालिका कर्मचारी, प्रभाग अधिकारी गायब झाल्याचे दिसत होते.