दुचाकी ‘टो’ केल्याने वाद, ठाण्यात वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 05:42 PM2017-12-06T17:42:28+5:302017-12-06T17:48:36+5:30
नो पार्किंगमध्ये लावलेली मोटारसायकल उचलल्याने ठाण्यातील तीन हात नाका येथे बुधवारी चांगलाच वाद झाला. एका रहिवाशाने वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालून धक्काबुक्कीही केल्याने पोलिसांनी त्याच्याविरूद्ध कारवाई केली.
ठाणे : नो पार्कींगमध्ये उभी केलेली मोटारसायकल उचलल्याने वाद होऊन ठाण्यातील एका रहिवाशाने वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की केली. तीन हात नाक्याजवळ बुधवारी दुपारी ही घटना घडली.
तीन हात नाका भागात बुधवारी दुपारी नो पार्किंगमध्ये लावलेल्या मोटारसायकल्स उचलण्याचे काम सुरू होते. त्यावेळी आयडिया गॅलरीसमोर उभी केलेली एक मोटारसायकल टोर्इंग व्हॅनवरील कर्मचार्यानी उचलली. ठाण्यातील दौलत नगरातील कमलेश श्यामसुंदर लालवानी यांची ही मोटारसायकल होती. मोटारसायकल उचलल्याने त्यांनी टोर्इंग व्हॅनवरील कर्मचार्याशी वाद घालण्यास सुरूवात केली. टोर्इंग व्हॅनवर वाहतूक शिपाई अरूण शिंदे हे कार्यरत होते. त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, लालवानी यांनी त्यांच्याशीही वाद घालण्यास सुरूवात केली. लालवानी यांनी शिंदे यांना धक्काबुक्की केल्याने वाद चिघळला. टोर्इंग व्हॅनवरील एका खासगी कर्मचार्याने या प्रकाराचे त्याच्या मोबाईल फोनमध्ये चित्रिकरण करण्यास सुरूवात केली. त्यामुळे आणखी चिडलेल्या लालवानी यांनी त्याचा मोबाईल फोन आपटून त्याचे नुकसान केले. नौपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी लालवानी विरूद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला.
ठाण्यात वाहनतळांचा अभाव असून, वाहनांच्या तुलनेत पार्किंगसाठी पुरेसी जागा नाही. त्यामुळे टोर्इंग व्हॅनवरील वाहतूक पोलिसांशी वाद होण्याच्या घटना ठाण्यात वाढत आहेत. नो पार्कींगमधील वाहने उचलण्यापूर्वी उद्घोषणा करण्याचा नियम आहे. या नियमांचे पालन कुठेच होत नाही. याशिवाय वाहनधारक मोटारसायकल उभी करून जवळपासच गेला असेल आणि वाहन उचलल्यानंतर त्याने लगेच येऊन वाहन परत मागितले असेल, तर परत देणे अपेक्षित असते. मात्र वाहन उचलताना वाहनधारकाने येऊन विनंती केली तरी त्याला वाहन परत केले जात नाही. वाहनधारकांशी वेळोवेळी वाद होण्याचे हेदेखील एक महत्वाचे कारण आहे.