उंबर्डेत कचरा टाकण्यावरून वाद: कल्याणमध्ये कचरागाडी चालकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 01:37 AM2020-05-05T01:37:15+5:302020-05-05T01:37:30+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका अखेर पुरवणार पोलीस संरक्षण
डोंबिवली : कल्याण शहरातील वादग्रस्त आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी काही दिवसांपासून उंबर्डे येथील घनकचरा प्रकल्पात महापालिका हद्दीतील कचरा नेण्यात येत आहे. पण त्याला स्थानिकांनी विरोध करत कंत्राटी आणि ठोकपगारी कचरागाड्यांच्या चालकांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने संबंधितांनी आम्हाला आधी सुरक्षा पुरवा आणि आरोग्यासाठी मास्क, हॅण्डग्लोज, सॅनिटायझर द्या, या मागणीसाठी सोमवारी सकाळी आंदोलन केले. त्यामुळे शहरात कचरा साचल्याचे पाहायला मिळाले.
ठाकुर्लीनजीकच्या खंबाळपाडा डेपोमध्ये कचऱ्याच्या गाड्या बंद ठेऊन कंत्राटी वाहनचालकांनी मारहाणीचा निषेध केला. पंधरा दिवसांपासून उंबर्डे परिसरात कचºयाच्या गाड्या गेल्यावर तेथे वाहनचालकांना विरोध होत आहे. त्याबाबत महापालिकेच्या वरिष्ठांना सूचित केले आहे, परंतू तरीही कोणतीही सुरक्षा न देता गाड्या नेण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे आमच्या जीवाला धोका असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अखेरीस आंदोलन करून आधी आम्हाला सुरक्षा द्या अन्यथा कचरा उचलणार नाही, असा पवित्रा घ्यावा लागल्याची माहिती मच्छिंद्र तांदळे, सुरेश मिरकुटे, सुनिल कंद, शरद चाळके, ज्ञानेश्वर पाटील यांनी दिली. तेथे सुमारे ४०० सफाई कामगार कार्यरत असून ३४० चालक असल्याचे ते म्हणाले. सुमारे १५० कचरा वेचक वाहने असून त्यात मोठी वाहने ७० असून अन्य घंटागाड्या आहेत.
ओला-सुका कचरा वर्गीकरण करणे अत्यावश्यक आहे. नागरिकांनी ही जबाबदारी पार पाडल्यास उंबर्डेत कमी प्रमाणात कचरा येईल. कामगारांनीही त्यांची जबाबदारी झटकून चालणार नाही. सोमवारी कामगारांना त्यांच्या जबाबदारीबद्दल समज देण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना आवश्यकतेनुसार पोलीस संरक्षणही दिले जाईल. दरम्यान, दुपारपासून कचरा उचलण्याचे काम सुरू झाले आहे.
- रामदास कोकरे, उपायुक्त, घनकचरा विघटन विभाग, कल्याण-डोंबिवली महापालिका