शिवसेनेचे दोन नगरसेवक भिडले, तलाव सुशोभीकरणाच्या प्रस्तावावरून वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 01:03 AM2020-01-21T01:03:48+5:302020-01-21T01:05:23+5:30
तलाव सुशोभीकरणाच्या प्रस्तावावरून सोमवारच्या महासभेत चांगलाच वादंग झाला.
ठाणे - घोडबंदर भागातील कासारावडवली येथील तलाव सुशोभीकरणाच्या प्रस्तावावरून सोमवारच्या महासभेत चांगलाच वादंग झाला. या तलावासाठी यापूर्वीदेखील तीन वेळा खर्च केल्याचा मुद्दा यावेळी शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांनी उपस्थित केला. तसेच ३६ तलावांच्या सुशोभिकरणामध्येही हा तलाव घेतला आहे. त्यामुळे एकाच तलावासाठी पुन्हा आठ कोटींचा खर्च कशासाठी असा सवाल करून या ठिकाणी जाणारे रस्ते, पायवाटा आदींची सोय करा,मगच तलाव सुशोभित करा असा मुद्दा त्यांनी लावून धरला. मात्र, दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांनी हा प्रस्ताव मंजूर करावा,अशी मागणी केली. त्यामुळे शिवसेनेच्या या दोन नगरसेवकांमध्ये चांगलेच घुमशान रंगले. अखेर यावर महापौरांच्या दालनात बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याची मागणी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांनी केल्याने हा वाद तात्पुरत्या स्वरुपात शमल्याचे दिसून आले.
आमदार प्रताप सरनाईक यांनी तलाव शुद्धीकरण आणि सौंर्दयीकरणाची मोहीम काही महिन्यांपूर्वी हाती घेतली होती. त्या अनुषगांने त्यांनी काही दिवसांपूर्वी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत या तलावाच्या शुद्धीकरण व सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव मांडला होता . त्यावेळी आयुक्तांनी या मोहिमेला महानगरपालिका सर्वोतोपरी सहकार्य करेन, असे आश्वासन दिले. त्यानुसार हा प्रस्ताव सोमवारच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला. मात्र, यापूर्वीदेखील तीन वेळा या तलावाच्या सुशोभिकरणासाठी खर्च केल्याचा धक्कादायक आरोपओवळेकर यांनी केला. तसेच, ३६ तलावांच्या सुशोभिकरणातही हा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर आहे. त्याचे कामही सुरू झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकाच तलावासाठी आणखी ८ कोटींचा खर्च कशासाठी असा सवालही त्यांनी केला. दुसरीकडे आधीच्या कामाचा खर्च झालेला नसल्याचे सांगून सध्या वर्कआॅडर दिल्याचे मान्य केल्यामुळे प्रशासनसुद्धा अडचणीत सापडले. मात्र,येथील रस्ता चांगला असल्याचा दावा त्यांच्याच पक्षातील नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांनी केला. त्यामुळे रस्ता चांगला नाही, हा मुद्दाच चुकीचा असल्याचेही त्यांनी सांगितले. या मुद्यावरून हे दोन नगरसेवक आपसात चांगलेच भिडले. अखेर यावर महापौरांच्या दालनात बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणी स्थायी समितीचे सभापती राम रेपाळे यांनी केली. त्यानंतर या वादासतूर्तास विराम देण्यात आला.
महाविकास आघाडीच्या घटक पक्षात बाचाबाची
हा वाद थांबतो नाही तोच महासभेची वेळ संपत येत असल्याचे लक्षात येताच, नगरसेवकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आणि बांधकाम विभागाशी संबधींत असलेले प्रस्ताव मंजूर करावेत, अशी सुचना राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केली. तसेच पाणी विभाग आणि इतर विभागाच्या संबधींत असलेले विषयही मंजूर करावेत अशी मागणीही काही नगरसेवकांनी केली.
त्यानुसार महापौरांनी त्या अनुषगांने रुलींग देऊन तसे प्रस्ताव मंजूर करून महासभा संपल्याचे जाहिर करण्याचा प्रयत्न केला. परंतु,यावेळी काँग्रेस, राष्टÑवादी आणि शिवसेनेचे अर्थात महाविकास आघाडीचे नगरसेवक आमने सामने आल्याचे दिसून आले. आम्ही केवळ सुचना केली होती. निर्णय घेण्यासाठी चर्चा झाली पाहिजे, असा सूर राष्टÑवादीने लावून धरला. तसेच विषयांचे वाचन नसतांना मंजूर कसे असा सवाल करून काँगे्रसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी आक्षेप घेतला. यावरून महापौर नरेश म्हस्के यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक यांची राष्टÑवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याचे दिसून आले. अखेर ही सभा स्थगित केल्याचे प्रशासनाला सांगावे लागले.