मीरा भाईंदर महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेत राजशिष्टाचाराची ऐशीतैशी; केंद्रीय मंत्र्यांनाच दुय्यम स्थान दिल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 12:40 PM2022-05-14T12:40:34+5:302022-05-14T12:42:03+5:30
या पत्रिकेत केंद्रीय मंत्र्यांनाच दुय्यम स्थान देण्यात आले असून कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेल्यांची नावे महापौरांनी टाकल्याने वादाला तोंड फुटले आहे.
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी महापौरांनी तयार केलेल्या निमंत्रण पत्रिकेतच राजशिष्टाचाराची ऐशीतैशी करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या पत्रिकेत केंद्रीय मंत्र्यांनाच दुय्यम स्थान देण्यात आले असून कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेल्यांची नावे महापौरांनी टाकल्याने वादाला तोंड फुटले आहे. तर, महापौरांनी मात्र आपण मंजूर केलेल्या पत्रिकेचा मसुदा अंतिम नसून, प्रशासनाने त्यावर निर्णय घ्यावा, असे म्हणत आपल्या स्वाक्षरीच्या मसुद्याची प्रत बाहेर गेलीच कशी? असा सवालही केला आहे .
मीरा भाईंदर महापालिकेच्या रामदेव पार्क येथील बौद्ध विहार व महाजनवादी येथील तरण तलावाचे उद्घाटन, अग्निशमन दलातील नवीन अग्निशामक वाहनाचे लोकापर्ण व बीएसयुपी योजनेतील लाभार्थ्यांना चाव्यांचे वाटप, असा कार्यक्रम १६ मे रोजी करण्यात आला आहे . परंतु सदर कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून महापौर ज्योत्सना हसनाळे विरुद्ध महापालिका आयुक्त दिलीप ढोले, असा मतभेद रंगला आहे .
त्यातच महापौरांच्या स्वाक्षरी सह मंजूर निमंत्रण पत्रिका, असा शेरा असलेली महापालिकेची निमंत्रण पत्रिका भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी त्यांच्या फेसबुकवर प्रसिद्ध केली आहे . त्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यात मेहतांचासुद्धा मा. विधानसभा सदस्य असा उल्लेख, विद्यमान खासदार - आमदारांच्या सोबत विशेष अतिथी म्हणून केला आहे . शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी महापौरांना पत्र लिहून एका वादग्रस्त माजी आमदाराचे नाव निमंत्रण पत्रिकेत टाकले तर आता पर्यंतचे शहरातील सर्व माजी खासदार व माजी आमदारांची नावे पण पत्रिकेत टाकावी लागतील, असे स्पष्ट कळवले आहे . त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी ठरवलेल्या राजशिष्टाचारा नुसार पालिकेच्या निमंत्रण पत्रिका छापाव्यात . तुम्हाला जर बेकायदेशीर पत्रिका छापायच्या असतील तर आमच्या नावांची यादी पण छापावी लागेल असे महापौरांना सुनावले आहे.
तर महापौरांच्या पत्रिकेच्या मसुद्यात सर्व भूमिपूजन व लोकार्पण हे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नमूद असून सर्वात वर त्यांचे नाव आहे . तर प्रमुख उपस्थिती मध्ये खालच्या रांगेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासह विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे , गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची नावे आहेत . शासनाच्या राजशिष्टाचाराच्या परिपत्रक नुसार तसेच पदांचे प्राधान्य याचा विचार न करता तसेच सभागृहाचे सदस्य नसलेल्यांचे नाव टाकून केवळ स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महापौरांनी पदाचा गैरवापर करत मनमानीपणे केल्याचा आरोप शिवसेनेच्या गटनेत्या नीलम ढवण यांनी केला आहे .
तर माझ्या स्वाक्षरीने मी मंजूर केलेल्या निमंत्रण पत्रिकेचा मसुदा पालिकेचे कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर यांच्या कडे होता . ती प्रत बाहेर गेलीच कशी? असा सवाल महापौरांनी केला आहे . आयुक्त व प्रशासनाने महापौरांशी चर्चा करून निमंत्रण पत्रिका तयार केली पाहिजे होती . पण तसे काहीच केले नाही. मी मंजूर केलेला मसुदा जर राजशिष्टाचाराप्रमाणे नसेल तर त्यावर आयुक्तांनी निर्णय घेऊन योग्य ती कार्यवाही केली पाहिजे, असे सांगत महापौरांनी फुटलेल्या निमंत्रणाच्या मसुद्या बाबत आपली भूमिका सांगितली. आपण स्वतः आपल्या अधिकृत निमंत्रण पत्रिका बनवू, तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी खाली बसू, अशी कोणतीच वक्तव्ये आपण केली नसल्याचे महापौर हसनाळे म्हणाल्या. या बाबत आयुक्तांशी प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता त्यांनी कॉल उचलला नाही .