उल्हासनगर पोस्ट कार्यालयाची दुरावस्था; दुर्गंधीने कर्मचारी पडले आजारी
By सदानंद नाईक | Published: September 11, 2023 05:31 PM2023-09-11T17:31:01+5:302023-09-11T17:31:17+5:30
कॅम्प नं-४ येथील पोस्ट कार्यालयात येणारे नागरिक दुर्गंधीमुळे थांबत नसून त्यांनी संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली आहे.
उल्हासनगर : शहरातील कॅम्प नं-४ येथील पोस्ट कार्यालायाला सांडपाण्याची गळती लागल्याने, कर्मचाऱ्यांसह येणाऱ्या नागरिकांवर सांडपाण्याचा अभिषेक होत आहे. साचलेल्या सांडपाण्याने कार्यालयात दुर्गंधी पसरून कर्मचारी आजारी पडत असल्याची माहिती पोस्ट मास्टर संदीप शेंगदाणे यांनी दिली. यावर उपाय म्हणून कार्यालयाला दुसरी जागा शोधल्याचे पोस्ट मास्तर म्हणाले.
उल्हासनगरात कॅम्प निहाय पोस्ट कार्यालय असून कॅम्प नं-४ येथील पोस्ट कार्यालय एका इमारतीच्या तळमजल्यावर भाडेतत्त्वावर कार्यरत आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पोस्ट कार्यालयात इमारतीचे सांडपाणी झिरपणे सुरू झाले. सद्यस्थितीत पोस्ट कार्यालयाची दयनीय अवस्था झाली. कार्यालयात सांडपाणी झिरपल्याने, कार्यालयात सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली. कार्यालयाचे स्वच्छतागृह दुर्गंधीयुक्त असून कर्मचारी मानसिक तणावाखाली काम करीत असल्याचे चित्र आहे. कार्यालयात सतत सांडपाण्याचा अभिषेक होत असल्याने, त्यापासून बचावासाठी कार्यालयात लोखंडी पत्रे लावले आहेत.
कॅम्प नं-४ येथील पोस्ट कार्यालयात येणारे नागरिक दुर्गंधीमुळे थांबत नसून त्यांनी संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली आहे. संध्याकाळी पोस्ट कार्यालय बंद करतांना, कार्यालयातील सर्व संगणक व साहित्य प्लास्टिक कागदाने झाकून टाकण्याची वेळ आली आहे. कार्यलयात उंदिर व घुशीचा सुळसुळाट असल्याने, साहित्य व संगणक मधील इलेक्ट्रिकल वायर कुरतडले जात असल्याची माहिती कर्मचारी व पोस्ट मास्टरानी दिली आहे. गेल्या १५ वर्षा पासून पोस्ट कार्यालय भाड्याच्या इमारतीत कार्यरत असून कार्यालयाची अवस्था बघता, केंव्हाही मोठी घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दुपारचे जेवण टाळले जाते
पोस्ट कार्यालयात इमारातीचे सांडपाणी गळत असल्याने, सर्वत्र दुर्गंधी पसरली. परिणामी अनेक कर्मचारी दुपारचे जेवण टाळत आहेत. कार्यालयाच्या आत पत्रा लावण्यात आला. त्याखाली इतर कर्मचारी दुपारचे जेवण करीत असल्याचे चित्र आहे.
कर्मचारी पडतात आजारी
पोस्ट कार्यालयाचे पोस्ट मास्टर संदीप शेंगदाणे यांनी कार्यालयातील दुर्गंधीमुळे कार्यालयातील कर्मचारी आजारी पडत असल्याची माहिती दिली. त्यामुळे कार्यालय कामात व्यत्यय येत असल्याचे ते म्हणाले.
पोस्ट कार्यालय इतरत्र हलविणार
पोस्ट कार्यालयाला सांडपाण्याची गळती लागल्याने, कार्यालयाला अवकळा आली. तसेच कार्यालयातील कॉम्प्युटरसह इतर साहित्य खराब होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे कार्यालय इतरत्र हलविण्यात येणार असून जागा बघितल्याची माहिती पोस्ट मास्टर यांनी दिली. पोस्ट कार्यालयाच्या माहिती बाबत जिल्हा कार्यालयाला संपर्क केला असता झाला नाही