महावितरणच्या कार्यालयाची नासधूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 01:13 AM2019-06-12T01:13:51+5:302019-06-12T01:14:10+5:30
गुन्हा दाखल : वीजपुरवठा खंडित झाल्याने जमावाने केली तोडफोड
कल्याण : शहरात सुरु असलेल्या विजेच्या लपंडावाने संतप्त झालेल्या जमावाने वालधुनी येथील महावितरणच्या कार्यालयात घुसून त्याठिकाणी असलेल्या संगणकाचे मॉनिटर आणि प्रिंटरची सोमवारी मध्यरात्री नासधूस केली. याप्रकरणी सहाय्यक अभियंता मोहन कापडणे यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगर येथील शांतीनगर परिसरात असलेली उच्चदाबाची विद्युत वाहिनी मध्यरात्री तुटल्याने वीजप्रवाह खंडित झाला होता. याठिकाणी काम सुरु असल्याने वालधुनी परिसरातील विद्युत पुरवठा बंद झाला होता. त्यामुळे या भागातील काहीजण एफ केबीन येथे असलेल्या कार्यालयात आले. यावेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या वायरमनला विद्युत पुरवठा सुरु करण्यास सांगितले. तेव्हा उल्हासनगर येथील वायर तुटल्याने तिथे काम सुरु असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर कार्यालयात कोणी नसल्याचे पाहून कार्यालयाचा लाकडी दरवाजा तोडत जमावाने कार्यालयात प्रवेश केला. कार्यालयातील संगणकाचा मॉनिटर आणि प्रिंटर उचलून आपटला. उल्हासनगर येथील काम आटोपून पहाटे ४.३० च्या सुमारास परतलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयाची तोडफोड झाल्याचा प्रकार दिसला. याप्रकरणी सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करित पोलिसांनी तपास सुरु केला आहे.