१.१५ लाख ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:07 AM2019-02-27T00:07:32+5:302019-02-27T00:07:35+5:30
४४३ कोटी थकीत : कळवा, मुंब्रा आघाडीवर
ठाणे : एकीकडे कळवा, मुंब्य्रात सध्या टोरन्ट वीज कंपनीच्या मुद्यावरुन गोंधळ सुरु आहे. असे असताना या भागातील वीज ग्राहकांकडे सर्वाधिक थकबाकी आहे. या भागातील वीज ग्राहकांनी मागील काही वर्षांत महावितरणचा तब्बल ३८९.४४६ कोटींचा भरणा केला नसल्याचा माहिती समोर आली आहे. त्यामुळे या ७७ हजार ५ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरुपी खंडित केल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली. ठाणे १,२ आणि विभाग तीनमधील थकबाकीदार वीज ग्राहकांची वीजही कायमची खंडित करण्यात आली आहे. संपूर्ण ठाणे शहरात १ लाख १५ हजार ५८० वीज ग्राहकांचा वीज पुरवठा कायमचा खंडित करण्यात आला असून त्यांनी महावितरणची ४४३.११ कोटींची देणी थकवली आहेत.
कळवा, मुंब्य्राच्या वीज खाजगीकरणाचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे. टोरन्ट कंपनीला कळवा, मुंब्य्रात पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी दिला आहे. दुसरीकडे महावितरण मात्र टोरन्टसाठी आग्रही आहे. येथील वीजेची मागणी, थकबाकी आणि उत्पन्नाचे गणित जुळत नसल्यानेच खाजगीकरणाची कुºहाड या भागावर उगारण्यात आली आहे. आता त्यात काही अंशी तथ्य असल्याचेही महावितरणच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. महावितरणने थकबाकीदारांची आणि कायमचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये ठाणे डीव्हीजन २ मध्ये येणाऱ्या कळवा, पॉवर हाऊस आणि विकास आदी भागांचा समावेश असून येथील १८ हजार ३६८ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा कायमचा खंडित करण्यात आला आहे. येथील वीज ग्राहकांनी महावितरणची २६.३७ कोटींची थकबाकी थकवली होती.
ठाणे डिव्हीजन तीनमध्ये मुंब्रा शीळ भागातील ७७ हजार ५ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी तब्बल ३८९.४४६ कोटींची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे.
वागळे इस्टेट सब डिव्हजन भागातील कोलशेत, लोकमान्य आणि वागळे इस्टेट येथील १२ हजार ८९५ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला असून त्यांच्याकडे १८ कोटी ८०५ कोटींची थकबाकी होती. ठाणे डिव्हीजन १ मध्ये येणाऱ्या गडकरी, किसन नगर आणि कोपरी भागातील २२६७ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून त्यांनी महावितरणची ८ कोटी ८ लाख २२ हजारांची थकबाकी ठेवली होती.