मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाकुर्ली स्थानकात रेल्वेचा वीज पुरवठा खंडीत, अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2017 08:12 PM2017-10-13T20:12:40+5:302017-10-13T20:33:59+5:30
ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरला वीज पुरवठा करणा-या यंत्रणेत बिघाड झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता घडली. बदलापूरला जाणारी गाडी घटनास्थळावर खोळंबली होती.
डोंबिवली: ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरला वीज पुरवठा करणा-या यंत्रणेत बिघाड झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता घडली. बदलापूरला जाणारी गाडी घटनास्थळावर खोळंबली होती. त्यामुळे त्या गाडीतील प्रवाशांचे सर्वाधिक हाल झाले. एक लोकल अडकली त्यापाठोपाठ मुंबईकडे तसेच कल्याणच्या दिशेने जाणारी जदल मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे आतोनात हाल झाले.
या घटनेमुळे जलद मार्गावरुन घरी परतणा-या लाखो चाकरमान्यांचे हाल झाले. ठाणे ते दिवा मार्गावर जलदच्या डाऊन दिशेवर लोकल खोळंबल्या. अनेकांनी दिवा स्थानक गाठत धिमा मार्गावरुन पुढे जाण्यासाठी ट्रॅकमध्ये उतरण्याचा पर्याय निवडला. यामध्ये अनेक प्रवाशांचे हाल झाले. दिवा ते डोंबिवली गाठण्यासाठी धीम्या मार्गावरील प्रवाशांना पाऊण तास लागल्याची माहिती बदलापूरचे रहिवासी संजय मेस्त्री यांनी दिली. मेस्त्री हे बदलापूरला जाणा-या लोकलने प्रवास करत होते, त्यांची लोकल दिवा स्थानकात खोळंबली, त्यामुळे त्यांनी दिवा स्थानक गाठत धीम्या मार्गावरील लोकलने कल्याण गाठण्याचा प्रयत्न केला.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनिल उदासी यांनीही वीज पुरवठा करणा-या यंत्रणेत अचानक बिघाड झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. रात्री आठ वाजले तरी ठाकुर्लीत घटनास्थळी ओएचईसह विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु होते. अचानक जलदची गर्दी धीम्या मार्गावर आल्याने ठाणे ते डोंबिवली मार्गावरील धीम्या मार्गावरील फलाटांवर तुडुंब गर्दी झाली होती. या घटनेचा परिणाम धीम्या मार्गावरील वाहतूकीवर झाला. त्या गाडयांची वाहतूक देखिल पंधरा ते वीस मिनिटे विलंबाने धावली.
सोशल मिडियावर विठ्ठलवाडी, कल्याण आदी स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याची माहिती आल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. व्हॉट्सअॅपवर रेल्वेच्या जनसंपर्क अधिका-यांनी संदेश दिला. तसेच वस्तूस्थिती मांडली. दरम्यान, रात्री 8 च्या सुमारास डाऊन जलद मार्ग (कल्याणला जाणारा) सुरू झाला असून मुबंईकडे जाणार अप जलद मार्ग सुरू जाण्यासाठी सुमारे अर्धा तास जाणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.