जिल्ह्यात माध्यमिक शाळांच्या ११०३ शिपायांच्या नोकरीवर गंडांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:39 AM2021-03-19T04:39:46+5:302021-03-19T04:39:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात ४३४ माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळा कार्यरत आहे. यातील एक हजार १०३ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात ४३४ माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळा कार्यरत आहे. यातील एक हजार १०३ चतुर्थ श्रेणी म्हणजे शिपाईपदांची सेवा आता कायमची बंद केली आहे. या कार्यरत शिपायांच्या नोकरीवर गंडांतर आल्यामुळे या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील स्वच्छता, साफसफाई व्यवस्थेची जबाबदारी व्यवस्थापनावर देण्यात आली आहे. त्यासाठी शासनाकडून दरमहा ठरावीक भत्ता देण्यात येणार आहे.
ठाणे महापालिकेसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर या सहा महापालिकांसह जिल्हा परिषदेच्या व नगर परिषदांच्या कार्यक्षेत्रत अनुदानित ४३४ माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांसह अंशत: अनुदानित, विनाअनुदानित आदी एक हजार ६२० हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालये जिल्ह्यात कार्यरत आहेत. यामध्ये सात हजार ७३७ शिक्षक, १६ हजार ४९० शिक्षिकांसह तब्बल २४ हजार २२७ शिक्षक कार्यरत आहेत. याशिवाय आठ हजार ९१ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्ह्याभरातील या ३२ हजार ३१८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून ९ वी ते १२ वीच्या चार लाख ४२ हजार ५०७ विद्यार्थ्यांना या एक हजार ६२० हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यादानाचे कार्य सध्या सुरू आहे.
जिल्ह्यातील या ४३४ अनुदानित हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सद्य:स्थितीला चतुर्थ श्रेणीमधील शिपाई, नाईक, पहारेकरी, रात्रीचा पहारेकरी, सफाईगार, कामाठी, तेलवाला, हमाल, परिचर, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर आदी पदांचे एक हजार १०४ चतुर्थश्रेणी कर्मचारी जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयांत कार्यरत आहेत. पण आता त्यांची ही सेवा नव्या आदेशानुसार संपुष्टात आलेली आहे. यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ११ डिसेंबर २०२० ला अध्यादेश जारी करून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची सेवा यापुढे कमी करून त्या जागी नवीन आकृतिबंध तयार केला आहे. वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर या पदांची सेवा कायमची बंद (व्यपगत) होईल. यानंतर खासगी अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांकरिता चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदाऐवजी यापुढे ठोक स्वरूपात ‘शिपाई भत्ता’ अनुज्ञेय राहील. तो दरमहा दिलेल्या निकषाप्रमाणे देऊन व्यवस्थापनावर त्यांची हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालयाच्या संबंधित सेवांची जबाबदारी साेपविली आहे.
..........