गणेशोत्सवाच्या तोंडावर कोरोनाचे विघ्न; आरोग्य यंत्रणा झाली सज्ज
By अजित मांडके | Published: August 23, 2022 04:08 PM2022-08-23T16:08:46+5:302022-08-23T16:09:13+5:30
मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असून या आजाराच्या रुग्णांची संख्या देखील १०० च्या आत आली असून मृत्यूची संख्या देखील शून्यावर आली आहे.
अजित मांडके
ठाणे : कोरोना कमी होत आहे, असे वाटत असतांनाच आता गणेशोत्सवाच्या तोंडावर कोरोनाचे विघ्न पुढे येत असल्याचे दिसत आहे. मागील १५ दिवसात जिल्ह्यात ३ हजार ७४१ कोरोनाचे नवे रु ग्ण आढळून आले असून ३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची नोंद आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे. त्यात स्वाइन फ्लुच्या रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत असल्याने गणोशोत्सावासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.
मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असून या आजाराच्या रुग्णांची संख्या देखील १०० च्या आत आली असून मृत्यूची संख्या देखील शून्यावर आली आहे. अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी होत असून तोंडावरचा मास्क देखील गायब झाल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी, ऑगस्ट २०२२ महिन्याच्या सुरुवातीला १०० च्या आत असलेली रुग्णांची संख्या थेट २०० च्या घरात पोहोचली आहे. तर, मृत्यूची संख्या कासववगतीने सुरु आहे. त्यामुळे ८ ऑगस्ट २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीत कोरोनाच्या ३ हजार ७४१ नव्या रुग्णांची तर, ३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
ठाणे जिल्ह्यात मागील १५ दिवसात कोरोंचा प्रादुर्भाव देखील वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना बाधित नव्या रुग्णांची संख्या ३ हजार ७४१ वर जावून पोहोचली आहे. तर, ३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये १९ ऑगास्त रोजी सर्वाधिक ४४७ रुग्णांची नोंद करण्यात आली. तर, १६ ऑगस्ट रोजी सर्वात कमी ११८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
कोरोना हा आजार पूर्णतः संपुष्टात आला नाही. येत्या काही दिवसांवर गणेशोत्सव सण आला आहे. त्यामुळे हा सण साजरा करीत असताना, नागरिकांनी आरोग्याच्या त्रिसूत्रीचा वापर करणे गरजेचे आहे. - डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे.