प्रभाग सुधारणा निधीतील कपातीमुळे नगरसेवकांत नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:44 AM2021-07-14T04:44:34+5:302021-07-14T04:44:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महापालिकेतील नगरसेवकांना यापूर्वी नगरसेवक निधी ५० लाखांच्या आसपास, तर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेतील नगरसेवकांना यापूर्वी नगरसेवक निधी ५० लाखांच्या आसपास, तर प्रभाग सुधारणा निधी ६० लाखांपर्यंत मिळत होता. परंतु, आता येत्या सहा महिन्यांवर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका आल्याने जून महिन्यात झालेल्या महासभेत आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी प्रभाग सुधारणा निधी २५ लाख आणि नगरसेवक निधी ११ लाख मंजूर केला आहे. त्यानुसार आता प्रभागातील अत्यावश्यक कामे केली जाणार आहेत. यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर सुमारे ४८ कोटींचा बोजा पडणार असला तरी निधीत कपात केल्याने नगरसेवकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
यापूर्वी नगरसेवक निधी ४० ते ४५ लाख आणि प्रभाग सुधारणा निधी ५० ते ६० लाख रुपये मिळत होता. त्यात कपात करून नगरसेवक निधी ११ लाख, तर प्रभाग सुधारणा निधी २५ लाख दिला जाणार आहे. त्यातही या निधीतून प्रभागातील केवळ अत्यावश्यक कामे करावीत, असेही सांगितले आहे. यासंदर्भातील आदेश आता महापालिका आयुक्तांनी काढले आहेत. या आदेशान्वये हा निधी देऊन त्या अनुषंगाने कामे मंजूर करावीत, असेही त्यात स्पष्ट केले आहे. तो टप्प्याटप्प्याने वाढवून मिळेल, असे बोलले जात असले तरी तो एकदाच दिला जाणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर या तूटपुंज्या निधीत कामे कशी करायची, असा पेच नगरसेवकांपुढे निर्माण झाला आहे.