प्रारूप प्रभाग रचनेवरून रिपाइंत मात्र असंतोष; उल्हासनगरातील दबंग नगरसेवकांचें प्रभाग सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 07:08 PM2022-02-02T19:08:30+5:302022-02-02T19:09:52+5:30
उल्हासनगर महापालिका प्रभाग रचना एका बंद खोलीत दबंग नेत्यांच्या सोयीसाठी केली जात असल्याची चर्चा यापूर्वी रंगली होती.
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका प्रारूप प्रभाग रचनेत बहुतांश दबंग नेत्यांचे प्रभाग सुरक्षित असून रिपाइंचे शहाराध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव यांनी दलित वॉर्ड फोडल्याचा आरोप केला. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेले मराठा सेक्शन परिसरातील तीन प्रभाग कमी लोकसंख्येचे केल्याची टीका होत असून प्रभाग रचनेचा फटका ४ ते ५ दबंग नेत्यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उल्हासनगर महापालिका प्रभाग रचना एका बंद खोलीत दबंग नेत्यांच्या सोयीसाठी केली जात असल्याची चर्चा यापूर्वी रंगली होती. त्यावेळी उपमहापौर भगवान भालेराव यांनी आरोप प्रत्यारोप केले होते. दरम्यान १ फेब्रुवारी रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यावर, सर्वच पक्षातील दबंग नगरसेवकांचे वॉर्ड सुरक्षित असल्याची चर्चा सुरू झाली. त्यांनी प्रारूप प्रभाग रचनेवर टीका करण्याचे टाळले असून प्रभाग रचनेचा फटका बसणाऱ्या ४ ते ५ नगरसेवकांनी हरकती घेणार असल्याचे सांगितले. यामध्ये स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी, रिपाईचे शहरजिल्हाध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव हे आघाडीवर आहेत. मराठा सेक्शन परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला असून येथील तिन्ही प्रभाग प्रत्येकी सरासरी १५ हजार ५०० लोकसंख्येचे करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
महापौर लिलाबाई अशान व नगरसेवक अरुण अशान यांचा प्रभाग क्रं-२०, शिवसेना नेते चंद्रकांत बोडारे कुटुंबाचा प्रभाग क्रं-२१, नगरसेवक शेखर यादव यांचा प्रभाग क्रं-२३, सभागृहनेते भारत गंगोत्री यांचा प्रभाग क्रं-२६ व २७, विरोधी पक्ष नेते राजेश वानखडे यांचा प्रभाग क्रं-२५, साई पक्षनेते जीवन इदनानी यांचा प्रभाग क्रं-१६ व १७, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांचा प्रभाग क्रं-१५, त्याच प्रमाणे भाजपचे शहाराध्यक्ष व गटनेते जमनुदास पुरस्वानी, प्रकाश माखिजा, मीना आयलानी, पंचम कलानी यांचेही प्रभाग सुरक्षित असल्याचे बोलले जात आहे. भाजपचे नगरसेवक व स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी, रिपाइंचे शहाराध्यक्ष भगवान भालेराव, प्रभाग क्रं-१९ मधील नगरसेवकांनी प्रभाग रचने बाबत नाराजी व्यक्त केली.
प्रभाग रचनेचा अभ्यास केल्यानंतर प्रतिक्रिया...भाजप शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी
प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वपक्षातील बहुतांश दबंग नगरसेवकांचे प्रभाग सुरक्षित झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच प्रारूप प्रभाग रचनेवर कोणीही बोलण्यास धजावत नसल्याचे चित्र शहरात आहे. भाजपचे शहराध्यक्ष व गटनेते जमनुदास पुरस्वानी यांनी मात्र प्रभाग रचनेचा अभ्यास केल्यानंतर मीडियाला प्रतिक्रिया देणार असल्याचे म्हटले.