जि. प. शाळांमध्ये सुभाष पवार यांनी साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:43 AM2021-09-25T04:43:47+5:302021-09-25T04:43:47+5:30
शहापूर : जिल्हा परिषदेच्या शहापूर तालुक्यातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांशी संवाद साधत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांनी ...
शहापूर : जिल्हा परिषदेच्या शहापूर तालुक्यातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांशी संवाद साधत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांनी शालेय प्रशासनाला भेडसावणाऱ्या समस्यांसाेबतच शाळेतील भौतिक सुविधांबाबत माहिती घेतली.
कोरोना आपत्तीच्या काळात रुग्णसंख्या घटल्यानंतर ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील काही शाळा सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी व शिक्षकांना अडचणी आहेत का, त्याचबरोबर शाळांमध्ये भौतिक सुविधा, शाळांची दुरुस्ती, नवीन वर्गखोल्या, संरक्षक भिंती, शौचालये, सौरऊर्जा स्रोत आदी सुविधांबाबत माहिती घेतली. त्याचबरोबर शाळा उभारण्यासाठी जागेच्या समस्या, स्थानिक ग्रामस्थांच्या तक्रारी आदींबाबत अडचणी समजून घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. शहापूर तालुक्यातील सापगाव, शेरेपाडा, अल्याणी, अस्नोली, नडगाव (सो), परटोळी, उंभरई, मलेगाव ठुणे, शेणवे, साठगाव, मुसई व खैरे (रस्ता) आदी ठिकाणच्या शाळांना मंगळवार, २१ सप्टेंबर राेजी त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशीही संवाद साधला. या दौऱ्यात पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल केंद्रप्रमुख विलास वेखंडे यांचा सत्कार करण्यात आला. खर्डी-कसारा भागातील शाळांना लवकरच भेट देण्यात येईल, असे उपाध्यक्ष पवार यांनी जाहीर केले. यावेळी जि. प. सदस्य राजेश विशे, काशिनाथ पष्टे, निमंत्रित सदस्य चिंतामण वेखंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नीलेश भांडे, उपसभापती जगन पष्टे, उपसरपंच शरद राव, विनायक सापळे, गोपाळ अंदाडे, भाऊ भांडे, जिल्हा समग्र शिक्षा अभियानाचे कार्यालयीन अधीक्षक युवराज कदम, गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण, हिराजी वेखंडे, अभियंता माळी आदी अधिकारी उपस्थित होते.