कसारा घाटातील अंतर पाच मिनिटात हाेणार पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:40 AM2021-09-19T04:40:37+5:302021-09-19T04:40:37+5:30
कसारा : बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर कसारा घाटात शहापूर तालुक्यातील वाशाळा ते इगतपुरीच्या नांदगाव सदाेपर्यंत आठ किमी लांब ...
कसारा : बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर कसारा घाटात शहापूर तालुक्यातील वाशाळा ते इगतपुरीच्या नांदगाव सदाेपर्यंत आठ किमी लांब आणि १७.५ मीटर रुंद असे दुहेरी बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. या महामार्गावर मुंबईकडे जाण्यासाठी व मुंबईहून येण्यासाठी स्वतंत्र आठ किलोमीटरचे दोन बोगदे तयार केले आहेत. या बाेगद्यामुळे कसारा घाटातील अंतर अवघ्या पाच मिनिटात पार हाेणार असून, देशातील सर्वात रुंद आणि चौथ्या क्रमांकाचा हा दुहेरी बोगदा असल्याचा दावा करण्यात आला आहे.
रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक व सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अनिलकुमार गायकवाड आणि उपजिल्हाधिकारी तथा एमएसआरडीसीच्या प्रशासक रेवती गायकर यांनी गुरुवारी (१६ सप्टेंबर) अभियंत्यांसोबत समृद्धी महामार्गांवरील या बोगद्यांची चाचणी व पाहणी केली. एफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे प्रोजेक्ट व्यवस्थापक शेखर दास यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता शक्ती उपाध्याय, राजीव सिंह, एम. एन. राव, परीतकर, पारीख व त्यांच्या १५०० कामगार व १५० अभियंते अशा माेठ्या टीमने हे शिवधनुष्य पेलले. अवघ्या दाेन वर्षांत हा दुहेरी बाेगदा पूर्ण करून विक्रम नाेंदवला आहे. अभियांत्रिकीच्या इतिहासात भारतात तरी अशी नोंद नाही, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. दरम्यान, शहापूर ते इगतपुरीदरम्यान सुरू असलेल्या नवयुगा कंपनीच्या कामांचीही पाहणी अधिकाऱ्यांनी केली. हे काम समाधानकारकरीत्या पूर्ण झाले असून, ठाणे ते नाशिक जिल्ह्यातील हा टप्पा वर्षभरात पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ऑस्ट्रेलियन तंत्राचा वापर
५५ हजार कोटींचा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग ७०० किलोमीटरचा असून, इगतपुरीतील दुहेरी बोगदा हा या महामार्गाचा महत्त्वाचा टप्पा आहे. दाेन हजार ७४५ कोटी खर्च करून हा बोगदा खोदण्यासाठी ऑस्ट्रेलियन तंत्राचा वापर करण्यात आला होता. कसारा घाट पार करण्यासाठी वाहतूक कोंडी नसेल तर २० ते २५ मिनिटे लागतात. मात्र या बोगद्यातून कसारा घाट पार करण्यासाठी केवळ पाच मिनिटे लागणार आहेत. दोन वर्षांत दुहेरी बोगद्याचे काम पूर्ण झाल्याने एफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या अभियंत्यांनी आनंद व्यक्त केला.