राष्ट्रवादी काँग्रेसला मुरबाडमध्ये खिंडार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:01 AM2019-09-01T00:01:39+5:302019-09-01T00:01:42+5:30
उद्धव ठाकरे यांची उपस्थिती । सुभाष पवारांनी बांधले शिवबंधन
मुरबाड : राष्ट्रवादी काँंग्रेसला मुरबाड तालुक्यात खिंडार पडले असून, ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, मुरबाड तालुकाध्यक्ष रामभाऊ दळवी यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना भवनात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे पवार यांनी जाहीर केले.
या वेळी शिवसेनेचे सचिव व खासदार अनिल देसाई, राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार रूपेश म्हात्रे, शांताराम मोरे, माजी आमदार पांडुरंग बरोरा आदी उपस्थित होते. पवार यांच्याबरोबरच जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती किशोर जाधव, समाजकल्याण समितीच्या सभापती संगीता गांगड, भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती इरफान भुरे, मुरबाड बाजार समितीचे सभापती चंद्रकांत बोष्टे, जिल्हा परिषदेचे सदस्य प्राजक्ता भावार्थे, दीपाली झुगरे, किसन गिरा, निखिल बरोरा, कल्याण तालुकाध्यक्ष चंद्रकांत गायकर, रवींद्र टेंबे आदींनी शिवसेनेत प्रवेश केला. पवार यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यात मोठे जाळे तयार केले आहे. गोटीराम पवार यांनी २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी तब्बल ५० हजार मते मिळवली होती. मात्र, त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतरच्या निवडणुकीतही मुरबाड विधानसभा मतदारसंघातून मुरबाड तालुक्यातून त्यांना आघाडी मिळाली होती. ठाणे जिल्हा परिषदेत पावणेदोन वर्षांपासून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आहे. त्यात पवार यांनी उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. यापूर्वी पवार यांनी मुरबाड पंचायत समितीचे सभापतीपद भूषवले होते. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते संचालक आहेत. पवार यांच्या सेना प्रवेशाने मुरबाडमधील राष्ट्रवादी काँग्रसेला चांगला धक्का बसला आहे.
मुरबाड तालुक्याच्या विकासासाठी शिवसेनेने नेहमीच अग्रक्र म दिला. शिवसेनेने कधीही पक्षभेद केला नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवानेते आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ठाणे जिल्ह्यातील तळागाळापर्यंत शिवसेनेला आणखी मजबूत करण्यासाठी कार्य करणार आहोत. इतर पक्षांत प्रवेश करताना त्या पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजी असते. मात्र, शिवसेनेत प्रवेश करताना शिवसैनिकांचा उत्साह पाहावयास मिळत असल्याचे पवार यांनी आवर्जून नमूद केले.