श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेकरीता ठाणे जिल्ह्याला २९ लाख ७९ हजार रुपये वितरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2022 02:24 PM2022-06-10T14:24:47+5:302022-06-10T14:25:02+5:30
कोकण विभागासाठी ४ कोटी ३२ लाख
ठाणे : अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी असलेल्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेकरीता सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये ठाणे जिल्ह्यासाठी २९ लाख ७९ हजार २०० रुपये वितरीत करण्यात आली आहे. ठाणेसह संपूर्ण कोकण विभागातील जिल्ह्यांसाठी एकूण ४ कोटी ३२ लाख २३ हजार ९०० रुपये वितरीत करण्यात आले असून त्यात सर्वाधिक ३ कोटी ७० लाख ७४ हजार १०० पालघर जिल्ह्याला मिळाले आहेत.
वित्त विभागाने यासंदर्भात ८ जून रोजी पारित केलेल्या शासन निर्णयानुसार ३५ कोटी रुपयांची रक्कम वित्त विभागाने संपूर्ण राज्यासाठी वितरीत केली आहे. ठाणे जिल्ह्याला २९ लाख ७९ हजार २०० रुपये वितरित करण्यात आले आहे. वितरीत केलेल्या अनुदानाचे वाटप जिल्ह्यातील तालुक्यांना लाभार्थ्यांच्या प्रमाणानुसार करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.
ठाणे बरोबरच रायगडसाठी २९ लाख ६६ हजार २००, रत्नागिरी ७५ हजार २००, सिंधुदूर्ग ८६ हजार २००, पालघरला ३ कोटी ७० लाख ७४ हजार १०० एवढे अनुदान वितरित करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कळविलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येनुसार अनुदान वितरित करण्यात आल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.