रमजानमध्ये ‘पिस’कडून आतापर्यंत सहा हजार जेवणाच्या पाकिटांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:43 AM2021-05-06T04:43:05+5:302021-05-06T04:43:05+5:30
मुंब्रा : पवित्र रमजान महिन्यामध्ये लाॅकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या कुटुंबांतील सदस्यांनी सूर्योदयापूर्वी काहीही न खाता रोजा सुरू करू नये यासाठी ...
मुंब्रा : पवित्र रमजान महिन्यामध्ये लाॅकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या कुटुंबांतील सदस्यांनी सूर्योदयापूर्वी काहीही न खाता रोजा सुरू करू नये यासाठी पिस विश्वस्त मंडळाच्या वतीने मुंब्र्यातील कौसा भागामध्ये दररोज मध्यरात्रीपासून जेवणांच्या पाकिटांचे वाटप करण्यात येत आहे. दररोज २७५ याप्रमाणे २२ दिवसांमध्ये तब्बल सहा हजारांहून अधिक जेवणांच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले आहे. रमजानचा महिना संपेपर्यत हे वाटप सुरू रहाणार आहे.
कब्रस्तानमध्ये काम करणारे कर्मचारी तसेच रुग्णालयांमध्ये रुग्णांबरोबर रात्री थांबणारे नातेवाईक तसेच डाॅक्टर,परिचारिका यांना ते कर्तव्य बजावत असलेल्या ठिकाणी जाऊन पाकिटे दिली जात आहे. रमजान महिन्यात दिवसभर प्रतिकारक्षमता टिकून राहावी यासाठी जेवणामध्ये विविध प्रकारच्या मांसाहारी खाद्यपदार्थांचा समावेश केला जातो. मध्यरात्री दोन ते पहाटे चार वाजेपर्यंत पाकिटांचे वाटप केले जाते. यासाठी वाटप होत असलेल्या ठिकाणी रात्री एक वाजल्यापासून रांग लागते. मंडळाच्या वतीने गुरुवारपासून अन्नधान्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी मौलाना मुस्तकीन, रफिक चौगुले, खालिद चौगुले, परवेझ खान, झहिद सय्यद, सईद शेख आणि हानिफ पटेल यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष आशिक गारदी यांनी दिली.
.......