जिलानी इमारत दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबीयांना धनादेशाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:00 AM2021-02-23T05:00:33+5:302021-02-23T05:00:33+5:30
भिवंडी : शहरातील धामणकर नाका परिसरातील पटेल कंपाउंड येथील जिलानी इमारत दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या नातलगांना राज्य शासनातर्फे तीन तर ...
भिवंडी : शहरातील धामणकर नाका परिसरातील पटेल कंपाउंड येथील जिलानी इमारत दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या नातलगांना राज्य शासनातर्फे तीन तर केंद्र शासनातर्फे दोन लाख अशी एकूण पाच लाख रुपयांच्या सहाय्यता निधीच्या धनादेशांचे सोमवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात वाटप करण्यात आले. याप्रसंगी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांच्यासह ठाणे जिल्हाधिकारी उपस्थित होते.
२१ सप्टेंबर २०२० रोजी मध्यरात्री अचानक कोसळलेल्या या बिल्डिंगखाली दबल्याने ३८ व्यक्तींचा मृत्यू झाला होता, तर २१ नागरिक गंभीर जखमी झाले होते. महाराष्ट्र शासनातर्फे लवकरात लवकर मदत मिळण्याबाबत राज्याच्या भूकंप व पुनर्वसनमंत्र्यांकडे अनेक निवेदने सादर करून सततचा पाठपुरावा केल्याचे हे फलित आहे, असे मत शेख यांनी व्यक्त केले. कमी कालावधीत मदतीचे वाटप केल्याबद्दल शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सर्व संबंधितांचे आभार मानले. पालकमंत्री शिंदे यांनी भिवंडीतील जुन्या व अनधिकृत इमारतींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी क्लस्टर योजना अंमलात आणण्याबाबत मार्गदर्शन केले.
फोटो : २२ जिलानी भिवंडी मदत
..........
वाचली